होमपेज › Goa › गोवा डेअरीची सभा तासाभरात तहकूब 

गोवा डेअरीची सभा तासाभरात तहकूब 

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 1:38AMफोंडा : प्रतिनिधी

सहकार निबंधकांनी सात संचालकांना अपात्र ठरवल्यानंतरही रविवारी सकाळी 11 वाजता गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यात आली. मात्र, सभेच्या अध्यक्षस्थानी कुणीच नसल्याने तसेच नुकतेच नेमलेले प्रशासक  दामोदर मोरजकर हेही सभास्थळी न फिरकल्याने सभा तहकूब करण्याची मागणी शेतकरी सभासदांनी लावून धरली. तासभर चाललेल्या गोंधळानंतर सभा तहकूब करण्यात आली. व्यवस्थापकीय संचालक  डॉ. नवसू सावंत यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार येत्या 30 सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पुन्हा बोलावण्यात येणार आहे.

सहकार निबंधकांच्या कारवाईनुसार गोवा डेअरीच्या सात संचालकांना अपात्र ठरवण्यात आले व व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, निलंबन आदेशानंतरही शनिवारी डॉ. सावंत यांनी कुर्टी फोंडा येथील गोवा डेअरी कार्यालयाचा कार्यभार सांभाळला. मात्र, डॉ. सावंत  आपल्याला निलंबन आदेशाची प्रत मिळालेली नसल्याचे सांगितले. या सर्वसाधारण सभेला सुमारे 100 सभासद दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

सत्यशोधक समितीने गोवा डेअरीतील घोटाळे उघड केल्यानंतर सहकार खात्याने नेमलेल्या सीए यतिश वेर्णेकर यांच्या अहवालानंतर दोषी आढळलेल्यांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. त्यातच गोवा डेअरीचे अभियंते विनायक धारवाडकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अटकेची केलेली कारवाई ताजी असल्यामुळे सर्वसाधारण सभा कोणाच्या नेतृत्वाखाली होणार याबाबतही चर्चा सुरू होती. 

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार खात्यातील अधिकारी असणे क्रमप्राप्त असते. मात्र, सर्वसाधारण सभेत सहकार खात्याचे कोणते अधिकारी हजेरी लावणार याबाबतही बरीच उत्सुकता होती. सर्वसाधारण सभेत सहकार निबंधक कार्यालयातून सहाय्यक निबंधक पंकज मराठे यांनी उपस्थिती लावली होती.