Wed, Mar 27, 2019 02:32होमपेज › Goa › विठ्ठल चोपडेकर पणजीचे महापौर  

विठ्ठल चोपडेकर पणजीचे महापौर  

Published On: Mar 15 2018 1:55AM | Last Updated: Mar 15 2018 1:55AMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी बाबूश मोन्सेरात गटाच्या विठ्ठल चोपडेकर यांची व उपमहापौरपदी अस्मिता केरकर यांची  बिनविरोध निवड झाल्याची घोषणा  बुधवारी आयुक्‍त अजित रॉय यांनी केली. त्यामुळे मनपावर आता गोवा फॉरवर्डचा झेंडा फडकला आहे. शहरातील कचरा समस्या, विकासकामे, मान्सूनपूर्व कामे यांना प्राधान्य देणार असल्याचे यावेळी नूतन महापौर चोपडेकर यांनी सांगितले. 

महापौर व उपमहापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार होती. मात्र, विरोधी भाजप गटाने  माघार घेऊन  मोन्सेरात गटाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने चोपडेकर व केरकर यांची बिनविरोध  निवड झाली. यावेळी मोन्सेरात, तसेच पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. 30 नगरसेवकांपैकी मोन्सेरात गटाचे 15 नगरसेवक, सुरेंद्र फुर्तादो व रुथ फुर्तादो हे दोन अपक्ष नगरसेवक व विरोधी भाजप गटाचे 13 पैकी 12 नगरसेवक उपस्थित होते. भाजपच्या नगरसेवक आरती हळर्णकर काही कारणास्तव  उपस्थित नव्हत्या.नवनियुक्‍त महापौर चोपडेकर यांनी महापौरपदासाठी आपल्यावर विश्‍वास ठेवल्याबद्दल मोन्सेरात यांचे  आभार मानले. शहरातील विविध कामांसाठी  आयुक्‍तांबरोबरच सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे.  नगरसेवकपदी दोन वर्षे पूर्ण करताना महापौरपदाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे.