होमपेज › Goa › किनार्‍यांच्या स्वच्छतेस सरकार बांधील

किनार्‍यांच्या स्वच्छतेस सरकार बांधील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील समुद्र किनारे अस्वच्छ व कचर्‍यामुळे विद्रुप झाले असल्याने पर्यटकांनी तिथे जाऊ नये, असा अपप्रचार  करून गोव्याच्या बदनामीची मोहीम काही विशिष्ट लोकांनी हाती घेतली आहे.  मात्र, ती मोहीम हाणून पाडून स्थानिक तसेच पर्यटकांना स्वच्छ किनारे उपलब्ध करण्यासाठी सरकार बांधील आहे, असे प्रतिपादन उपसभापती तथा कचरा व्यवस्थापन महमंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी केले. 

गोव्यातील समुद्र किनारी भागात स्वच्छता ठेवण्यासाठी ‘तेरा मेरा बीच’ ही सफाई मोहीम शनिवारी सुरू करण्यात आली. कळंगुट येथील किनार्‍यावर उपसभापती मायकल लोबो यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.  

राज्यातील सुमारे 105 कि.मी. लांबीच्या किनार्‍यांवर साफसफाई करण्याचे कंत्राट ‘दृष्टी ’या किनार्‍यावर सुरक्षा पुरवणार्‍या जीवरक्षक कंपनीला देण्यात आले आहे. सध्या  या कंपनीला कांदोळी, कळंगुट, बागा, मिरामार तसेच कोलवा या राज्यातील पाच महत्त्वाच्या किनार्‍यांवर प्रायोगिक तत्त्वावर साफसफाई ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. या कंपनीच्या वतीने ‘तेरा मेरा बीच’ या मोहिमेअंतर्गत किनार्‍यावर साफसफाई  सुरू करण्याचे काम शनिवारी हाती घेण्यात आले. पुढील दीडशे दिवस (पाच महिने) ही मोहीम किनार्‍यांवर राबवण्यात येणार असून हे अभियान संध्याकाळी 5 ते 6.30 या वेळेत चालणार असून कचरा संकलन व त्याच्या व्यवस्थापनाविषयी लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. या अभियानासाठी  संगीत व कलेचा आधार घेतला जाणार असून पर्यटन खात्याने या अभियानाला पाठिंबा दिला आहे, असे लोबो यांनी सांगितले.
कार्यक्रमाला ‘दृष्टी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर उपस्थित होते. 

लोबो म्हणाले, लोकांना किनार्‍यांवर स्वच्छता पाहिजे असल्यास किनार्‍यांवर बाटल्या घेऊन जाणे टाळणे गरजेचे आहे. किनार्‍यांवर बियर बाटल्यांच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. राज्यातील किनार्‍यांबरोबर इतर भाग प्लास्टीकमुक्त होणे गरजेचे असून आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे  प्लास्टीकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, असे लोबो यांनी सांगितले.