Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Goa › मराठी चित्रपट महोत्सवास प्रारंभ

मराठी चित्रपट महोत्सवास प्रारंभ

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी

11 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पणजी येथील  कला अकादमीच्या मास्टर  दिनानाथ मंगेशकर सभागृहात राज्यपाल मृदुला सिन्हा व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत पडदा  उघडला. महोत्सवाची  सुरूवात ‘वेलकम होम’ या चित्रपटाने झाली. तर यंदाच्या  ‘कृतज्ञता पुरस्काराने’ गोमंतकीय पार्श्‍वगायिका लॉर्ना यांचा सन्मान करण्यात आला.  

पुरस्कार प्राप्‍त झाल्यानंतर लॉर्ना यांनी कातार सादर करुन उपस्थित  रसिकांची मने  जिंकली.  तीन दिवसीय  महोत्सवात सुमारे 22 चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना लाभणार आहे.

राज्यपाल  मृदुला सिन्हा   म्हणाल्या, की गोव्यात अनेक कलाकार आहे. यात अभिनयापासून ते चित्रकारांचा समावेश आहे. गोव्यात कलाकारांना वाव आहे. आपला   मराठी भाषेशी संबंध असून मराठी भाषा  आपल्याला   समजते. 

 कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की  गोव्यात मागील  11 वर्षांपासून सातत्याने मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते.  गोव्याने केवळ हिंदी चित्रपटसृष्टीलाच  नव्हते तर मराठी चित्रपटसृष्टीला देखील अनेक कलाकार दिले आहेत.   गोवा ही कलाकारांची खाण असून   या महोत्सवाला  दरवर्षी   मिळणार्‍या प्रतिसादात भर पडत आहे. 

 व्यासपीठावर  बॉलीवूड निर्माते   मधूर भंडारकर, मराठी चित्रपट कलाकार सचिन पिळगावकर, प्रिया बापट, मोहन आगाशे, प्रसाद ओक, सुमती राघवन, छाया कदब, कल्याणी मुळे, निर्माते दिग्दर्शक रवी जाधव,  गजेंद्र अहिरे, सचिन कुंडलकर, सुमित्रा भावे, कोकणी  चित्रपट जुजेचे सिध्देश नाईक, मिरांशा नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.  

 उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर   गगन सदन या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमात  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायिलेल्या मराठी गाण्यांवर  कलाकारांनी नृत्य सादर केले. प्रिया बापट यांना फेस ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

चित्रपट वेळापत्रक 
कला अकादमीत  ‘आम्ही दोघी’  ‘व्हॉटसअप लग्न’, ‘निद्राय’, ‘रणांगण’ व‘ पिंपळ’ हे चित्रपट प्रदर्शित होतील. मॅकनिज पॅलेस 1 मध्ये  ‘न्यूड ’, ‘फरझांड’, ‘ खरवस’ (लघुपट) , ‘जुझे’, ‘पळशीची पीटी’ व  ‘बबन’ हे चित्रपट तर मॅकनिज पॅलेस 2 मध्ये  ‘ गुलाबजाम’, ‘धप्पा’, ‘बिबट्या’ (लघुपट) व  ‘झिपर्‍या’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. आयनॉक्स 4 मध्ये ‘वेलकम होम’, ‘बकेट लिस्ट’, ‘कच्चा लिंबू’, ‘रेडू’, ‘लाठी जोशी’ व  ‘इडक ’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. 1930 वास्को सिनेमागृहात ‘रेडू’ व ‘व्हॉटसप लग्न’ हे दोन चित्रपट पहिल्या दिवशी प्रदर्शित केले जातील.