Tue, Feb 19, 2019 22:21होमपेज › Goa › महाराष्ट्रात जाणार्‍या ‘कदंब’ च्या 36 बस फेर्‍या रद्द

महाराष्ट्रात जाणार्‍या ‘कदंब’ च्या 36 बस फेर्‍या रद्द

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 11 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमुळे गोव्यातून महाराष्ट्र राज्यात ये-जा करणार्‍या ‘कदंब वाहतूक परिवहन महामंडळा’च्या सुमारे 36 बस फेर्‍या गुरूवारी बंद ठेवण्यात आल्या. महाराष्ट्रातून गोव्यात येणार्‍या ‘एसटी’ बस गाड्याही येऊ शकलेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असल्याचे कदंबच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून गुरूवारी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली होती. मराठा आंदोलनात याआधी झालेल्या गाड्यांच्या जाळपोळीची दखल घेऊन कदंबच्या बसगाड्यांना हानी पोहोचू नये यासाठी वरील निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात हा बंद कडकपणे पाळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कदंब गाड्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कदंब बसगाड्यांच्या  महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, मिरज, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण तसेच अन्य ठिकाणी जाणार्‍या 36 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. कदंब नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात जाणार्‍या कदंबच्या काही बसगाड्या सकाळी गेल्या. परंतु हद्दीपर्यंतच प्रवाशांची सोय करण्यात आली. कदंबच्या बसेस राज्याच्या पत्रादेवी, दोडामार्ग, सातार्डा  आदी सीमावर्ती भागातपर्यंतच गेल्या. महाराष्ट्र बंदमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या फेर्‍या रद्द करण्यात  आल्या असल्याचे कक्षातील अधिकार्‍यांनी सांगितले. 

महाराष्ट्राकडे जाणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसगाड्या मात्र नेहमीप्रमाणे सुरू होत्या. कोल्हापूरकडे तसेच अन्य भागातही खासगी बसगाड्या रवाना झाल्या.