Tue, Mar 26, 2019 07:43होमपेज › Goa › मान्सूनचे जोरदार आगमन

मान्सूनचे जोरदार आगमन

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:55AMपणजी : प्रतिनिधी  

राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून शुक्रवारी राजधानी पणजीसह   विविध ठिकठिकाणी पाऊस पडला. येत्या 48 तासांत राज्यात अतिवृष्टीचा इशारा पणजी वेधशाळेने जारी केला आहे. समुद्रात न जाण्याचा इशाराही जारी केला आहे. 

पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार  मागील 24 तासांत मुरगाव तालुक्यात  18  सें.मी. पावसाची नोंद झाली. काणकोण व मडगाव येथे प्रत्येकी 9 सें. मी. , पणजी, फोंडा, पेडणे व दाबोळीत प्रत्येकीत 7 सें.मी, म्हापसा,  जुने गोवे व  केपे येथे प्रत्येकी 3 सें मी, सांगेत 2 सें मी तर  साखळी व वाळपई येथे प्रत्येकी  1 सें. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

राज्यात शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने  पादचार्‍यांबरोबरच वाहनचालकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने पणजी महापालिकेच्या परिसरात अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. 

मिरामार, कांपाल येथील रस्त्यावर पाणी साचल्याने पणजी महापालिकेचे कर्मचारी रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे उघडून कचरा काढण्याचे काम करीत होते. पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर व अधिकारी या कामावर लक्ष देत होते. काही ठिकाणी असलेली गटारे डांबरीकरणावेळी बुजविल्याने पाणी जाण्यासाठी गटाराची वाट बुजल्याने रस्त्यावर पाणी साचून राहिले होते. पहिल्या पावसातच राजधानी पणजीत पाणी साचल्याने महापालिकेसमोर समस्या उभी राहिली आहे. शुक्रवारी सकाळी पासून काणकोणात पावसाची रिपरिप चालू होती. डिचोली, हरमल, पेडणे, वाळपई, फ ोंडा या भागात जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.