Mon, Sep 24, 2018 17:52होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून मंत्रालयात

मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून मंत्रालयात

Published On: Sep 13 2018 1:43AM | Last Updated: Sep 13 2018 12:44AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेहून राज्यात परतले असले तरी त्यांनी अजूनही मंत्रालयाला भेट दिलेली नाही. सध्या ते पूर्ण विश्रांती घेत असून चतुर्थीनंतर सोमवारी ते   कामकाज सुरू करतील,असे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेहून तिसर्‍यांदा वैद्यकीय उपचार घेऊन गोव्यात परतले तरी, त्यांचे आरोग्य त्यांना हवे तसे साथ देत नसल्यामुळे ते बुधवारीही मंत्रालयात येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाने याआधी  पर्रीकर सोमवारी मंत्रालयात येतील, असे सांगितले होते.  मात्र, ते सोमवारी व मंगळवारीसुद्धा कार्यालयात आले नव्हते. मुख्यमंत्री गेले अनेक दिवस मंत्रालयात येऊ शकलेले नाहीत. मंत्रिमंडळाची बैठकही मागील अनेक आठवडे घेण्यात आलेली नाही. काही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी बाय सर्क्युलेशन पद्धतीने मंत्र्यांकडे फिरत होते, ते मंजूर झाले आहेत.

आजारी मंत्र्यांचा खातेबदल चतुर्थीनंतरच?

मंत्रिमंडळातील एकूण तीन सदस्य आजारी असून ते मंत्रालयात येऊ शकत नाहीत. अशावेळी आजारी मंत्र्यांच्या जागी दुसर्‍या आमदारांना संधी मिळायली हवी, असा सूर भाजपमधील एका मोठ्या गटाने आळवलेला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अजून  तरी आजारी मंत्र्यांच्या खातेबदलाबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही. मात्र प्रशासनाच्या गरजेसाठी आणि असंतुष्टांना काहीसे खूश करण्यासाठी चतुर्थीनंतर आजारी मंत्र्यांची खाती अन्य मंत्र्यांमध्येच वाटण्याचा , अथवा एखाद्या भाजप आमदाराला मंत्रिपद देण्याचा प्रयोग केला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.