Fri, Jul 19, 2019 23:07होमपेज › Goa › ‘मगो’च्या केंद्रीय समितीला  2 वर्षांच्या मुदतवाढीचा ठराव

‘मगो’च्या केंद्रीय समितीला  2 वर्षांच्या मुदतवाढीचा ठराव

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:55PM

बुकमार्क करा

पर्वरी  ः वार्ताहर

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या  विद्यमान केंद्रीय समितीला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा ठराव रविवारी  पक्षाच्या आमसभेत मंजूर करण्यात आला. केंद्रीय समितीने मुदतवाढीच्या काळात 27 मतदारसंघात नव्या कार्यकारिणी समित्यांची निवड करून नंतर अर्ज मागवून नवी केंद्रीय समिती निवडावी, असाही निर्णय घेण्यात आला. आमसभेत व्यासपीठावर बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दीपक पाऊसकर, लवू मामलेदार, म्हार्दोळकर, नारायण सावंत, गजानन नाईक, परशुराम कोटकर, आपा तेली, योगानंद फडते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आपल्या भाषणात     सांगितले की, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम मतदार आमच्या पक्षापासून लांब राहतात. याची दखल घेऊन येणार्‍या काळात कारणे शोधून त्यांना आमच्या पक्षाचे सदस्य करणार आहोत. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले. खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या ट्रक व्यावसायिकांचा प्रश्‍न  पक्षाची केंद्रीय समिती सरकार समोर मांडून सोडवणार असून ट्रक मालकांना योग्य न्याय देणार आहे. तसेच येत्या फेब्रुवारीपासून सर्व मतदारसंघांत नवीन  समित्या निवडून पक्ष संघटना बळकट करणार आहोत. नवीन समिती निवडताना जुन्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन युवा आणि महिला संघटना स्थापन करणार आहोत, असेही दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा सामान्य लोकांचा पक्ष आहे. आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून पक्ष बांधणी करणे गरजेचे आहे, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.  आमसभेत कार्यकर्त्यांना आपली मते मांडू न दिल्यामुळे काही काळ गोंधळ झाला. पण नंतर कार्यकर्त्यांना  नेत्यांनी समजावल्यानंतर गोंधळ थांबला. म्हार्दोळकर यांनी स्वागत केले. नारायण सावंत यांनी सूत्रसंचालन करून त्यांनीच आभार मानले.