Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › कुतिन्होंसह कार्यकर्त्यांना अटक, सुटका

कुतिन्होंसह कार्यकर्त्यांना अटक, सुटका

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 31 2018 12:31AMमडगाव : प्रतिनिधी

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलातील उपनिबंधक कार्यालयातून जन्म आणि मृत्यूचे दाखले देण्यास वेळकाढूपणा केला जात असल्याच्या निषेधार्थ प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपनिबंधक कार्यालयावर गुरुवारी सकाळी धडक मोर्चा नेऊन सुमारे दोन तास ठिय्या दिला. या प्रकारामुळे लोकांची गैरसोय झाल्याने फातोर्डा पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
उपनिबंधकांना लोकांची गैरसोय दूर करणे शक्य झाले नाही, असा आरोप करून प्रतिमा कुतिन्हो व त्यांच्या सहकार्‍यांनी सकाळी 11 वाजता उपनिबंधक कार्यालयात प्रवेश केला. यावेळी दाखले मिळविण्यासाठी लोकांची भली मोठी रांग लागली होती. प्रतिमा कुतिन्होंसह महिला काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चामुळे लोकांना बराचवेळ अडकून राहावे लागले. बरीच चर्चा झाल्यानंतर  सात दिवसांचा वेळ देऊन मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्याचवेळी फातोर्डा पोलिस फौजफाट्यासह उपनिबंधक कार्यालयात दाखल झाल्याने संतापलेल्या महिला काँग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी कार्यालयाच्या बाहेर न जाण्याचा निर्णय घेऊन तिथेच ठिय्या दिला. सुमारे दीड तास उपनिबंधक कार्यालयात ठाण मांडून त्यांनी  सरकार विरोधात घोषणाबाजीही केली. पोलिसांनी बाहेर जाण्यास सांगितले, पण त्यांनी नकार देताच त्यांना बळाचा वापर करून बाहेर काढण्यात आले.पोलिसांनी नंतर सर्वांना ताब्यात घेतले.

जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी जनतेला होणार्‍या त्रासाची दखल घेऊन  एका महिन्यापूर्वी महिला काँग्रेस समितीने उपनिबंधक दुमिंगोस मार्टिन्स यांना भेटून दाखला देण्याची  प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी केली होती. महिन्यानंतरही लोकांना दाखल्यासाठी उपनिबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने उपनिबंधक दुमिंगोस यांना  जाब विचारला, असे कुतिन्हो यांनी सांगितले. कर्मचारी  कमी असल्याने लोकांचे दाखले देणे लांबणीवर पडते. एका महिन्यांपूर्वी महिला काँग्रेसकडून मागणी आल्यानंतर लगेच जन्म व मृत्यू नोंदणी संचालकांना अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अजूनही त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेले नाही. दररोज शंभर ते दीडशे लोक दाखल्यासाठी रांगेत उभे असतात, मात्र कर्मचार्‍यांची वानवा असल्याने आपण काहीच करू शकत नाही, असे उपनिबंधकांनी सांगितले.

महिला काँग्रेस आणि उपनिबंधक दुमिंगोस यांच्यात झालेल्या चर्चेत परिस्थिती सुधारण्यासाठी सात दिवसांचा अवधी देऊन महिला काँग्रेसने मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी फातोर्डा पोलिस  याठिकाणी दाखल झाले. फौजफाट्यासह आलेल्या पोलिसांची महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुर्य्यो उडवली.