Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Goa › लोकवस्तीतील भंगार अड्डे हटविणार

लोकवस्तीतील भंगार अड्डे हटविणार

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 12:45AM

बुकमार्क करा

मडगाव ः प्रतिनिधी

फातोर्डा मतदारसंघातील गवळीवाडा परिसरातील बेकायदेशीर भंगार अड्ड्याला अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटना नागरिकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. नागरिकांच्या जीवाचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने  पुढील आर्थिक वर्षांपासून भंगार अड्यांना लोक वसाहतीत परवानगी दिली जाणार नाही. भंगार अड्ड्यांना लोक वसाहती परिसरातून हटवून नियुक्त क्षेत्रात स्थलांतरित केले जाणार आहे. लोक वसाहती परिसरातील मोकळ्या जागेत भंगार अड्डे होऊ देणार नाही, असे आश्‍वासन नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई फातोर्डा गवळीवाडा येथील भंगार अड्ड्याची पाहणी करताना लोकांना दिले. 

नगरनियोजन  मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी फातोर्डा गवळीवाडा येथील भंगार अड्ड्यांची पाहणी  केली. गेल्या 10 दिवसांपूर्वी पुन्हा फातोर्डा मतदार संघातील गवळीवाडा परिसरात  सुरू असलेल्या भंगार अड्ड्याला आग लागून दुर्घटना घडली.  शहरात घडलेल्या दुर्घटनेनंतर मडगाव आणि फातोड्यातील बेकायदेशीर भंगार अड्ड्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  वारंवार दुर्घटना  होत असून येथे झालेला सिलिंडरचा स्फोट ही गंभीर बाब  आहे. 

 मंत्री विजय सरदेसाई म्हणाले, की या भागात होणार्‍या दुर्घटनांना स्थानिकांनी विरोध दर्शवत भंगार अड्ड्यांना हटविण्याची मागणी केली होती.  नागरिकांच्या विनंतीवरून  यावर लवकरच उपाय काढण्यात येणार आहे. येत्या आर्थिक वर्षात लोक वस्तीच्या परिसरातील भंगार अड्डे हटविण्यात येणार आहे, त्यांना नियुक्त क्षेत्रात स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र, भंगार अड्ड्यांसाठी ही नियुक्त क्षेत्रे सरकारला तयार करावी लागणार आहे.

 मंत्री सरदेसाई म्हणाले, की   रिकामी जागा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भंगार अड्डे करण्यात आले होते. बेकायदेशीरपणेही जागा हडप करण्यात आल्या होत्या. यापुढे असे होणार नाही, ती जागा पंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहे. शहरातील स्थानिकांच्या मोकळ्या जागेवर भंगार अड्ड्यांना या पुढे  परवानगी दिली जाणार नाही.  मोकळ्या जागेवर अड्डे घातल्यास त्यांच्यावर कारवाई  होणार आहे. आग लागलेल्या ठिकाणांचा तपास 19 डिसेंबर पासून करण्यात येणार आहे.