Sat, Apr 20, 2019 18:10होमपेज › Goa › गोव्यातील युवकांना गोव्यातच मिळणार नोकर्‍या

गोव्यातील युवकांना गोव्यातच मिळणार नोकर्‍या

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 10:40PM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

गोव्यातील तरुण तरुणींनी सरकारी नोकर्‍यांच्या मागे न धावता जीवनात येणार्‍या आव्हानांना सामोरे जात स्वतःबरोबरच गोव्यालाही पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोव्यातील युवकांना गोव्यातच नोकर्‍या देण्याचा आमचा प्रयत्न आहे,  असे प्रतिपादन नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केले. मडगावातील रवींद्र भवन येथे वी फॉर फातोर्डाद्वारे आयोजित नोकरी मेळाव्याच्या उद्घाटनसमयी प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री सरदेसाई बोलत होते.  वी फॉर फातोर्डाच्या अध्यक्षा उषा सरदेसाई, एमएसएमईचे राष्ट्रीय कौन्सिल अध्यक्ष मांगीरीश पै रायकर व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. 
मंत्री सरदेसाई म्हणाले, की गोव्यातील युवकांना गोव्यातच नोकर्‍या मिळायला पाहिजेत. नोकरीसाठी गोव्यातील युवकांनी परप्रांतात जाऊ नये, या उद्देशाने सरकारी व बिगर सरकारी संस्थाच्या माध्यमातून  नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नोकरी मेळाव्यात गोव्यातील युवकांना प्राधान्य मिळावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. 

मांगीरीश पै रायकर म्हणाले, की गोव्यातील गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, गोवा फार्मासिटीकल मॅन्यूफॅक्च्र्ल अससोसिएशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेंजर्स, चीफ ऑफ फॅक्ट्री अँड बॉयलर्स, एमएसएमई (केंद्रीय सरकारची संस्था), युनिट्स  एसएचओएम आदी नामांकित संघटना संस्थांना पहिल्यांदाच एकत्र आणण्यात आले आहे. गोमंतकीय मुलांना मनासारख्या नोकर्‍या मिळाव्यात हा त्या मागचा उद्देश आहे.  हा मेळावा दोन दिवशीय आहे. यासाठी युवकांची नाव नोंद करण्यात येणार आहे. कुशल, अकुशल, तांत्रिक, अतांत्रिक आदी भागात विभागणी केली जाणार आहे. त्यानंतर विभागलेल्या मुलांना त्या- त्या विभागात  मुलाखत देण्याची संधी देण्यात येणार आहे असे रायकर यांनी सांगितले.