Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Goa › मडगाव रवींद्र भवनाचे नूतनीकरण सुरू

मडगाव रवींद्र भवनाचे नूतनीकरण सुरू

Published On: Jan 21 2018 2:45AM | Last Updated: Jan 21 2018 2:30AMमडगाव : प्रतिनिधी

मडगाव शहराचे भूषण ठरलेल्या रवींद्र भवनच्या इमारतीचे  जनमत कौल दिनाच्या निमित्ताने नूतनीकरण करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे, इमारतीच्या दर्शनी भागाचे रंगकाम पूर्ण करण्यात आल्याने रवींद्र भवनाला पुन्हा झळाळी आलेली असून या इमारतीचे सौंदर्य खुलून दिसत आहे. प्रशासनाने रवींद्र भवनच्या अंतर्गत भागातील नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने कला रसिकांनी त्याचे स्वागत केले आहे.
रवींद्र भवन इमारतीच्या भिंती आतून  पोखरल्या गेल्याने  ठिसूळ होऊन भिंतींचा भाग पडू लागला होता.  

 छप्पर खिळखिळे झाले होते, तसेच पायर्‍यावरील मार्बल्स,पार्किंगच्या जागेवरील टाइल्स वा पेव्हर्स  उखडले गेले होते. तेथील काही पथदिवेही निकामी झाले होते.  सभागृहातील   भेगा पडलेल्या  भिंतींची डागडुजी करण्यात येत आहे.  भवनाच्या सभागृहात अनेक ठिकाणी पाण्याची गळती असून स्वच्छतागृहामध्ये काही नळांना पाणी येत नाही, अशी स्थिती आजही आहे. मोडलेल्या फ्लशची दुरुस्ती अद्याप झालेली नसल्याने  भवनात येणार्‍या रसिकांची गैरसोय होत आहे. 

विविध समस्यांनी  रवींद्र भवनाला ग्रासले  असल्याने   तात्काळ डागडुजीचे काम हाती घेण्याची मागणी  कला रसिकांकडून होत  होती. शिवाय नव्याने स्थापन झालेल्या मंडळासमोरही इमारतीच्या नूतनीकरणाचे  आव्हान होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रवींद्र भवनच्या तीन सभागृहांच्या अंतर्गत भागाच्या नूतनीकरणाचे काम  हाती घेतले असून मुख्य प्रवेश द्वार,स्वागतकक्ष, आतील पॅसेज, कॅन्टिन  आदी ठिकाणी  दुरूस्तीचे काम सुरू आहेे.   

कॅन्टीन महिला गटाकडे

कॅन्टिनमधील  खाद्यपदार्थ महागडे असतात, ही  तक्रार नित्याची झाली होती. साधा चहा व कॉफीसुद्धा  बाहेर हॉटलच्या दरापेक्षा दुप्पट दरात मिळत होता.  त्यामुळे  रवींद्र भवनच्या मंडळाने   फातोर्ड्यातील  महिला  स्वयंसहाय्य गटाला  कॅन्टिनचे कंत्राट सोपविले  आहे. त्यामुळे चहापान व इतर खाद्यपदार्थ उत्तम दर्जासह स्वस्त दरात प्राप्त होत आहेत.  कॅन्टीन परिसरातील  पूर्वीचा फलकसुद्धा काढण्यात आला असून  तेथे आकर्षक  पेंटिंग लावण्यात आले आहे. कॅन्टीनचा परिसर सजवण्यात आला आहे. 

नूतनीकरण गरजेचे

शीतल गावकर म्हणाल्या की, रवींद्र भवन  दक्षिण गोव्यातील मोठे सांस्कृतिक केंद्र असल्याने दररोज  देशविदेशातील  विविध लोक  भेट देतात. त्यामुळे या वास्तूची स्थिती बदलणे गरजेचे झाले होते.   रवींद्र भवनच्या स्थितीकडे पाहून  अनेकांचा हिरमोड होत होता. मात्र  अनेक वर्षानंतर  रवींद्र भवनचे एक नवे  रूप रंगरंगोटीच्या रूपाने  पहावयास मिळाले असून येथे अस्मिता दिन   उत्तमरित्या साजरा करण्यात आला.

 पायाभूत सुविधांचा विकास  ः प्रशांत नाईक

रवींद्र भवन ही वास्तू अत्यंत मोठी आहे त्याशिवाय  अनेक वर्षांपासून ही वास्तू दुर्लक्षित होती.त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती गरजेची  होती, असे रवींद्र भवनचे अध्यक्ष  प्रशांत नाईक म्हणाले.  भिंतीना तडे गेले असून डागडुजी सुरू आहे. तसेच सध्या रवींद्र भवनच्या अनेक पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम हाती घेतले असून टप्प्याटप्प्याने  ते  पूर्ण करण्यात येणार आहे,असेही ते म्हणाले.