Sat, Apr 20, 2019 08:29होमपेज › Goa › वादळी पावसाचा काणकोणातील फणस, काजूला फटका

वादळी पावसाचा काणकोणातील फणस, काजूला फटका

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 10:25PMकाणकोण : प्रतिनिधी

गेल्या मंगळवारी काणकोण तालुक्यात आलेल्या चक्री वादळात खोतीगाव व गावडोंगरी पंचायत क्षेत्रात  फणस, आंबा, काजूची झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच इतर पिकेही पावसाच्या पाण्यामुळे खराब झाल्याने अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती काणकोण अग्नी शमक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील भास गावातील फणसाची झाडे उन्मळून पडली. फणसाचा हंगाम आहे. बाजारात फणसाला बर्‍यापैकी मागणी आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसात मोठ्या प्रमाणात फणसाची झाडे उन्मुळून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे माजी सरपंच अशोक भिवा वेळीप यांनी सांगितले. 

तुडळ, गांवडोगरी येथील एका माध्यमिक शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी मोडून शाळेवर पडल्याने मोडून पडल्यामुळे शाळा इमारतीचे बरेच नुकसान झाले आहे. गावडोंगरी पंचायत क्षेत्रात 20 पेक्षा अधिक वीज खांब कोसळून पडल्याची माहिती काणकोण वीज खात्याचे सहाय्यक अभियंता विनायक महाळशेकर यांनी दिली. ठिकठिकाणी वीज तारा तुटून पडल्या असून त्या दुरुस्त करण्यात येत असल्याचेही महाळशेकर यांनी सांगितले . खोतीगाव पंचायत क्षेत्रातही विजेचे खांब, झाडे कोसळली आहेत.

या पंचायत क्षेत्रातील बडडे, येडा, आणि कुसके या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज वाहिन्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. खोतीगाव पंचायत क्षेत्रात असलेल्या पॉली हाऊस आणि ऑर्किड शेतीचेही बरेच नुकसान झाल्याचे शेतकरी दया गावकर यांनी सांगितले. पायक गावकर यांनाही बरेच नुकसान सोसावे लागले आहे. त्याचबरोबर कुसके येथील आणि बडडे भागातील शेतक-यांचे बरेच नुकसान झाले आहे.  गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात खोतीगाव पंचायत क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यात सुमारे 50हून जास्त शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. या शेतकर्‍यांना सरकाराने नुकसान भरपाई दिल्याचे खोतीगाव पंचायतीचे सरपंच दया गावकर यांनी सांगितले.

Tags : Goa, loss,  cashew,  mango, trees,  heavy, rain