होमपेज › Goa › ‘दूधसागर’जवळ दरड कोसळली

‘दूधसागर’जवळ दरड कोसळली

Published On: Aug 22 2018 12:55AM | Last Updated: Aug 22 2018 12:55AMमडगाव : प्रतिनिधी 

दूधसागर रेल्वे यार्डपासून अवघ्या काही मीटर अंतरावर दरड कोसळून दगड-मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर   पडण्याची घटना मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या ढिगार्‍यामुळे या मार्गावर धावणारी गोवा एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गाने वळविण्यात आली.

रेल्वे रुळावर दरड कोसळल्याचे  सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या लाईनमनला दिसून आले.दूधसागर यार्डापासून अवघ्या काही अंतरावर डोंगराचा काही भाग कोसळून दगड-माती कॅसलरॉकच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे मार्गावर पडले होते. दरड कोसळलेला भाग अत्यंत डोंगराळ आहे. डोंगर कापून मधून रेल्वे मार्ग काढण्यात आलेला आहे. पावसात काही प्रमाणात डोंगराचे कडे कोसळून दगड-माती रेल्वे रुळावर पडत असते. यावेळी पावसामुळे     सुमारे आठ ते दहा टन एवढा माती आणि खडकाचा भाग कोसळून रेल्वेरूळावर पडला. या मार्गावर नियमितपणे लाईनमन तपासणी करत असतात. ढिगारा कोसळल्याचे दिसताच लाईनमनने  तातडीने या घटनेची माहिती दक्षिण पश्‍चिम रेल्वेच्या वास्को कार्यालयाला आणि कुळे रेल्वे स्थानकाला दिली. या मार्गावरून मालवाहू रेल्वे आणि प्रवासी रेल्वे  नियमितपणे ये-जा करत असल्याने लगेच दगड-मातीचा ढिगारा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले.दुपारी 3 वाजेपर्यंत दगड-माती बाजूला काढून रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे दिली आहे.

वास्को येथील रेल्वेच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, सायंकाळी मार्ग खुला करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. या मार्गावरून धावणारी एकमेव गोवा एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन वळविण्यात आली आहे, पण आता दरड हटवण्यात आल्याने इतर वाहतूक या मार्गावरून केली जाऊ शकते, असे रेल्वे सुरक्षा अधिकारी सतीशन यांनी सांगितले.