Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Goa › कुठ्ठाळी वाहतूक कोंडीवर ‘स्लीप वे’चा उपाय 

कुठ्ठाळी वाहतूक कोंडीवर ‘स्लीप वे’चा उपाय 

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी

मडगाव-पणजी महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी  कुठ्ठाळी जंक्शनवर ‘स्लीप वे’ तयार करण्याचे तसेच वाहतूक पोलिस  व  भारतीय राखीव दलाच्या (आयआरबी) जवानांना तैनात करण्याचे आदेश मुख्य सचिव धर्मेश शर्मा यांनी दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्देशांचे पालन सार्वजनिक बांधकाम खाते आणि  पोलिस अधिकार्‍यांकडून तातडीने केले जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 

कुठ्ठाळी येथे मागील आठवडाभरापासून होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंबंधी विरोधी पक्ष काँग्रेसने  झुआरी पुलावरून काढलेली निषेध पदयात्रा पोलिसांनी रोखली असली तरी तीन दिवसांत वाहतूक कोंडीवर उपाययोजना न केल्यास पुन्हा  आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. याशिवाय, अनेक विद्यार्थी, महिला कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट मुख्यमंत्री पर्रीकर यांना ट्विटरवर संदेश पाठवले होते. राज्यातील सर्व  वृत्तपत्रांनी या विषयावर प्रकाशझोत टाकल्याने मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्वत: अमेरिकेहून मुख्य सचिव शर्मा यांना घटनास्थळी जाऊन तोडगा काढण्याचा आदेश दिला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

मुख्य सचिव शर्मा, प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती, पोलिस महासंचालक मुक्‍तेश चंदर, पोलिस वाहतूक महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी वाहतूक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसोबत कुठ्ठाळी जंक्शनला भेट देऊन पाहणी केली.सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही यावेळी सूचना केल्या. झुआरी पुलाच्या कुठ्ठाळी आणि आगशी दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याची पाहणी करून वाहतूक कोंडीवर नवी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. 

कुठ्ठाळी जंक्शनवर पणजीहून मडगावच्या दिशेने जाणार्‍या वाहनांसाठी ‘स्लीप वे’ तयार करण्यात येणार आहेत. झुआरी पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावरील वाढते खड्डे सतत आणि तातडीने बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत. 

वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या आणखी वाढवण्याचा आदेशही देण्यात आला असून पोलिस महानिरीक्षक सिंग यांनी तशी ‘नोट’ गृह खात्याकडे पाठवली आहे. आयआरबीच्या दोन प्लाटून झुआरी पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात येणार असून वाहतुकीची कुठेही अडवणूक होऊ नये, यासाठी नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सरकारने तातडीने राबवलेल्या या उपायांमुळे वाहतूक कोंडी कमी झाली असून वाहने सुरळीत धावत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.