Fri, May 29, 2020 00:12होमपेज › Goa › भोमवासीयांच्या अडचणीमुळे शेतातून बगलमार्ग

भोमवासीयांच्या अडचणीमुळे शेतातून बगलमार्ग

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:19PM

बुकमार्क करा

कुंभारजुवे ः वार्ताहर 

राष्ट्रीय महामार्ग 16 पत्रादेवी पणजी रस्त्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. भोम येथील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन याठिकाणी उड्डाणपुलाऐवजी बाजूच्या शेतातून बगलमार्ग तयार केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. याठिकाणी उड्डाण पूल हा चांगला पर्याय होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न असलेल्या बाणस्तारी येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन  मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते नुकतेच झाले. यावेळी ते बोलत होते.  

वृंदावन इंजिनिअर्स कन्स्ट्रक्शन या आस्थापनातर्फे साधारण रु. 10 कोटी 28 लाख खर्चून हाती घेण्यात आलेले भुयारी मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण झाल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
 कला आणि सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे, भोम अडकोणचे सरपंच सुनील भोमकर, पंचायत सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते विजयकुमार वेरेकर, विजय म्हार्दोळकर, दत्तप्रसाद कामत, दिगंबर नाईक आदी उपस्थित होते. 

मंत्री ढवळीकर म्हणाले, की राष्ट्रीय महामार्ग 4 जुने गोवे- फोंडाचे कामही लवकरच मार्गी लागणार आहे.  माशेल, बाणस्तारी रस्त्याचे रुंदीकरण लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तेथील दुकानदारांचे योग्य जागेत स्थलांतर होणार आहे. गोव्यातील महामार्ग विस्तार व विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना जाते. त्याचप्रमाणे मंत्री गोविंद गावडे, पांडुरंग मडकईकर, विश्‍वजीत राणे, 

आमदार दीपक पाऊसकर यांचे सहकार्य लाभत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. फोंडा व तिसवाडी तालुक्यातील पाणी पुरवठा 2018 पर्यंत सुरळीत होणार आहे. खांडेपार रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तेही येत्या वर्षांत मार्गी लागणार आहे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा बाणस्तारी येथील भुयारी मार्गाचे काम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी वेळेत पूर्ण केलेले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या चांगल्या प्रकारे चालले आहे. ग्रामीण भागातही चांगले रस्ते पोहोचविण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. बर्‍याच ठिकाणी रस्ते व इतर विकासकामांना विरोध होत असतो. मात्र, भविष्यातील विकासाची गरज म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. प्रियोळ मतदारसंघातील डोंगराळ भागात रस्ते होणे ही काळाची गरज आहे. मंत्री सुदिन ढवळीकर या कामासाठी पूर्ण सहकार्य देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्री सुदिन ढवळीकर व मंत्री गोविंद गावडे यांनी कामाची पाहणी केली. विजयकुमार वेरेकर व विजय म्हार्दोळकर यांनी स्वागत केले