Wed, Jan 23, 2019 04:26होमपेज › Goa › पणजी :अनुदान मिळूनही ‘कदंब’ तोट्यातच

पणजी :अनुदान मिळूनही ‘कदंब’ तोट्यातच

Published On: Feb 26 2018 12:42AM | Last Updated: Feb 25 2018 11:56PMपणजी : प्रतिनिधी

सार्वजनिक वाहतूक सेवा देणारे कदंब परिवहन महामंडळ सरकारकडून भरपूर अनुदान मिळूनही तोट्यात आहे. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये कदंबला 5 कोटी 19 लाखांचा नफा झाला होता. मात्र, ही स्थिती कायम राखण्यात कदंबला यश आले नाही. सरकारने 2016-17 या आर्थिक वर्षात ‘कदंब’ला 52 कोटी 94 लाख रुपये अनुदान दिले. पण या कालावधीत 3 कोटी 53 लाख 10 हजार रुपयांचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला आहे. 

सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी विधानसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सदर माहिती दिली आहे. 

राज्य सरकारकडून आर्थिक अनुदानाच्या स्वरूपात भरीव मदत मिळत असली तरी कदंब महामंडळ अजूनही तोट्यातच चालत आहे.  सध्या कदंब महामंडळात 900 चालक, 654 वाहक, मॅकेनिक तसेच प्रशासकीय विभागातील मिळून एकूण 2053 कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचार्‍यांच्या वेतनावरच वर्षाकाठी 95 कोटी 61 लाख 86 हजार रुपये तिजोरीतून खर्च करावे लागतात. कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी सरकारने महामंडळाला तब्बल 52 कोटी 94 लाख रुपये अनुदान दिले. 

मात्र ‘कदंब’ला 16 कोटी 70 लाख रुपयांचा  महसूल प्राप्त झाला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना कदंब बसेसमध्ये तिकीट दरात सवलत दिली जाते. या सवलतीची भरपाई म्हणून गेल्या आर्थिक वर्षात सरकारने 2 कोटी 33 लाख 78 हजार 501 रुपये कदंब महामंडळाला अनुदान रूपाने दिले. विद्यार्थ्यांना तिकीट दरात निम्मी सवलत दिली जाते. या सवलतीची भरपाई म्हणून सरकारने 10 कोटी 42 लाख 46 हजार 697 रुपये फेडले. या शिवाय ‘कदंब’ने आर्थिक विकास महामंडळ तसेच राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटी रुपये कर्ज घेतले. गेल्या आर्थिक वर्षात एकूण 95 कोटी 31 लाख 25 हजार 198 रुपये एवढे अनुदान ‘कदंब’ला मिळाले. 

2016-17 या आर्थिक वर्षात बसेसच्या टायर व ट्युबवर 1 कोटी 80 लाख 75 हजार 499 रुपये खर्च करण्यात आले. सुट्या भागांवर 2 कोटी 17 लाख 42 हजार 211 रुपये, मॅकेनिकच्या वेतनावरच 9 कोटी 58 लाख 53 हजार 923 रुपये, बसेसच्या दुरूस्तीवर 2 कोटी 73 लाख 62 हजार 498 रुपये, बसगाड्या धुण्यासाठी 36 लाख 14 हजार 525 रुपये, बॅटरी बदलण्यासाठी 17 लाख 85 हजार 327 रुपये खर्च करण्यात आले.