Sun, Jun 16, 2019 12:14
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › महाराष्ट्रात जाणार्‍या कदंबच्या 34 बसेस बंद

महाराष्ट्रात जाणार्‍या कदंबच्या 34 बसेस बंद

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:50AMपणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्‍यांनी शुक्रवारपासून (8 जून) अचानक पुकारलेल्या संपाचा फटका गोमंतकीयांनाही बसला आहे. गोव्याहून कदंब परिवहन महामंडळातर्फे महाराष्ट्रात जाणार्‍या सुमारे 34 बसगाड्या नुकसानीच्या भीतीने बंद ठेवण्यात आल्या. यामुळे कदंब महामंडळाचे सरासरी चार ते साडेचार लाख रुपयांच्या उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे कदंब महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी संजय घाटे यांनी सांगितले. 

गोव्याहून रोज कदंबच्या बसगाड्या केवळ पुणे, मुंबई, शिर्डी या महत्त्वाच्या ठिकाणावरच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या  शहरांतही जात असतात. या बसगाड्यांद्वारे महाराष्ट्रात रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात गोव्याच्या कदंब महामंडळाच्या बसेसना चांगली मागणी आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, मिरज, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व अन्य भागांमध्ये रोज पणजीहून कदंबच्या बसगाड्या जात असतात. महाराष्ट्रातील एसटीच्या संपामुळे राज्यातून शुक्रवारी सकाळी कदंबच्या काही बसगाड्या बांदा-सावंतवाडी अशा सीमेवरील भागापर्यंतच पाठवण्यात आल्या. त्यानंतर सर्व बसगाड़या पुढे न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक अथवा महाराष्ट्रातील संपावेळी दरवेळी गोव्याकडून ही खबरदारी घेतली जाते. गोव्यातील बसगाड़यांवर महाराष्ट्रात दगडफेक होऊ नये म्हणून तिथे संप काळात बसगाड़याच पाठवणे कदंब महामंडळ बंद करते. काही महिन्यांपूर्वी म्हादई पाणी प्रश्नी कर्नाटकमध्ये झालेल्या आंदोलनावेळीही गोव्याच्या कदंब महामंडळाने कदंबच्या बसगाड्या कर्नाटकमध्ये पाठविणे बंद केले होते, त्याचा आर्थिक फटका महामंडळाला सहन करावा लागला असल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

 ‘कदंब’ चे  घाटे म्हणाले, की महाराष्ट्रात जाणार्‍या कदंबच्या बसगाड्यांमुळे रोज कदंबला चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. महाराष्ट्रातील काही मार्गावर कदंबच्या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटेपर्यंत आम्ही गोव्याहून कदंबच्या बसगाड़या महाराष्ट्रात पाठवणार नाही. 

खासगी बसवाल्यांची ‘चांदी’
राज्यातून पुणे, मुंबईला जाणार्‍या खासगी बसगाड्यांनी आपली सेवा सुरू ठेवल्याने प्रवशांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. गोव्याहून गुरुवारी रात्री खासगी बसगाड्या मुंबई व पुण्याला गेल्या. खासगी बसगाड़यांचे प्रमाणही मोठे आहे. कदंबच्या बसगाड़या सकाळी महाराष्ट्रात न गेल्याने व महाराष्ट्रातूनही एसटी गोव्यात न आल्याने खासगी बसवाल्यांनी आपल्या तिकीटात भरमसाठ वाढ केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.