होमपेज › Goa › दोनापावला जेटी दुरुस्तीचे ५ कोटी पाण्यात 

दोनापावला जेटी दुरुस्तीचे ५ कोटी पाण्यात 

Published On: Feb 05 2018 1:41AM | Last Updated: Feb 05 2018 12:20AMपणजी : प्रतिनिधी

दोनापावला येथील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जेटीची सुमारे 10 वर्षांपूर्वी केलेली दुरुस्ती व सुशोभीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची  आणि नियमानुसार झाली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी खर्चण्यात आलेले 5 कोटी रुपये पाण्यात गेल्याने कंत्राटदाराच्या कामावर देखरेख करणार्‍या गोवा साधन सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी)  कारभारावर संशयाचे ढग जमले आहेत. 

राज्य सरकारने याआधी 2008 साली दोनापावला जेटीची सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम केले होते. सदर  काम ‘मे. एम. वेंकट राव इन्फ्रा प्रोजेक्ट्स’ या कंत्राटदाराला देण्यात आले होते. 

जेटीवरील बांधकामाला साधारण 30 वर्षे आयुष्यमान असावे लागते. मात्र, अवघ्या 10 वर्षांतच सदर बांधकाम कोसळू लागल्याने हे काम वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.  जेटीच्या बांधकामावर गतसाली सार्वजनिक बांधकाम खात्याने फेब्रुवारी -2017 मध्ये  केलेल्या सर्वेक्षणानंतर सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे आणि आवश्यक निकषांनुसार झाले नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. 

‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’च्या नियमावलीच्या ‘काँक्रीट कोड ऑफ प्रॅक्टीस’ नुसार  समुद्राजवळील जेटीचा आराखडा तेथील खारट वातावरण लक्षात घेता ‘एम-40’ ग्रेडचे सिमेंट वापरण्याची आवश्यकता आहे. या नियमानुसार, संपूर्ण जेटीची वजन पेलण्याची क्षमता प्रति चौरस सेंटीमीटरला 400 किलो प्रमाणे असणे गरजेचे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या परीक्षणानुसार सदर जेटीची विविध भागांतील क्षमता प्रतिचौरस सेंटीमीटरला 151 ते 258 किलो एवढीच असल्याचे आढळून आले आहे. जेटीच्या बांधकामासाठी वापरलेल्या काँक्रीटचे ‘अल्ट्रासॉनिक पल्स वेलोसिटी’ पद्धतीने केलेल्या चाचणीत सदर सिमेंटचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. 

जेटी बंद करण्यास विरोध : नाझारेथ

दोनापावला जेटीवरील सुमारे 50 विक्रेत्यांनी केवळ दुरुस्तीसाठी जेटी बंद करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे, असे  स्थानिक नगरसेवक नाझारेथ काब्राल यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.