Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Goa › ‘जीसीईटी’त साहस कामत अव्वल 

‘जीसीईटी’त साहस कामत अव्वल 

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 16 2018 1:38AMपणजी : प्रतिनिधी

भौतिकशास्त्र तसेच गणित आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांत 75 पैकी अनुक्रमे 68, 70 व 66 गुण प्राप्त करून साहस शैलेश कामत हा विद्यार्थी गोवा तांत्रिक शिक्षण संचालनालयाने  अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी घेतलेल्या गोवा समान प्रवेश चाचणी ‘जीसीईटी’त राज्यात अव्वल ठरला. गोवा तांत्रिक शिक्षण संचालनालयाने   दि. 8 व 9 मे रोजी घेतलेल्या ‘जीसीईटी’चा निकाल शिक्षण सचिव दौलत हवालदार यांनी सोमवारी (दि.14) जाहीर केला.

हवालदार म्हणाले, राज्यातून एकूण 4 हजार 169 विद्यार्थ्यांनी जीसीईटी चाचणी दिली. भौतिकशास्त्र विषय घेतलेल्या एकूण 4 हजार 169 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 994 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या विषयात साहस शैलेश कामत याने 75 पैकी सर्वाधिक 68 गुण प्राप्त केले. 

रसायनशास्त्र विषय घेतलेल्या एकूण 4 हजार 169 विद्यार्थ्यांपैकी  3 हजार 983 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.   या विषयात 75 पैकी सर्वाधिक 70 गुण संपादित करून रवींद्र कुडचडकर हा विद्यार्थी प्रथम आला.    
गणित विषय घेतलेल्या 3 हजार 235 विद्यार्थ्यांंपैकी 3 हजार 88 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात 75 पैकी सर्वाधिक 71 गुण  प्राप्त करून अर्श महेश कोरगावकर याने गणितात प्रथम स्थान पटकावले.      
तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत म्हणाले, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळावेत, यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित अशा तीन विषयांसाठी राज्यातील पंधरा परीक्षा केंद्रांमध्ये जीसीईटी  चाचणी घेण्यात आली होती. 

ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी  ए, बी अथवा सी हे अर्ज भरावेत. विहीत नमुन्यात  भरलेले अर्ज तांत्रिक शिक्षण संचालनालय, पर्वरी तसेच रवींद्र भवन मडगाव येथे सुट्टीचे दिवस वगळता 17 ते 25 मे दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते संध्याकाळी 5 पर्यंत स्वीकारले जातील. 

सदर अर्जांपैकी ‘ए’ (पिवळा फॉर्म) हा अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकरिता असून तो तांत्रिक शिक्षण मंडळ पर्वरी येथे उपलब्ध असेल. ‘बी’ (गुलाबी फॉर्म)  हा एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, एएचएस व नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छीणार्‍यांसाठी  असून तोदेखील पर्वरी येथे उपलब्ध असेल. तिसरा ‘सी’ फॉर्म हा बी.आर्क. वास्तूविशारद या शाखेत प्रवेश घेऊ इच्छीणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असून तो मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. अन्य चाचण्यांचा निकाल जाहीर झाला नसला तरीही सदर अर्जांचे नमुने 25 मे रोजी जमा करणे आवश्यक आहे. ‘नीट’, ‘नाटा’, ‘सीबीएसस्सी’  आदी  चाचण्यांच्या  निकालाची प्रत विद्यार्थी नंतर जोडू शकतात, असे  कामत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत आय. आय.टी. व्याख्याते एस. एस. मेजर, डॉ. व्ही. एन. शेट (प्राचार्य-गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय) आणि प्रदीप कुसनुर उपस्थित होते.

विषयवार पहिले चार गुणवंत विद्यार्थी

भौतिकशास्त्र ः  साहस शैलेश कामत - प्रथम (गुण 68),  भूषण  बालासामंत -व्दितीय (गुण 59), भालचंद्र गावस, रायनर कार्दोझ - तृतीय (गुण 57), अमेय वर्मा व रवींद्र कुडचडकर- चौथा क्रमांक  (गुण 56). 
 रसायनशास्त्र  ः रवींद्र कुडचडकर- प्रथम  (गुण 70), सिद्धांत पारेख - व्दितीय (गुण 68), वैभवी  गावस व  प्रस्मित भट - तृतीय (गुण 67), साहस शैलेश कामत,  बेदिशा शोमे व सुरज देसाई- चौथा क्रमांक (गुण 66).
 गणित ः अर्श महेश कोरगावकर- प्रथम (गुण 71), साहस शैलेश कामत व  आरोन अन्तोनिओ डायस बार्रेटो- व्दितीय (गुण 70), निलय  नाईक ,    रवींद्र कुडचडकर, कार्तिक बडीगेर- तिसरा क्रमांक (गुण 69).