Mon, Sep 24, 2018 19:02होमपेज › Goa › जांबावली गुलालोत्सवात रंगली

जांबावली गुलालोत्सवात रंगली

Published On: Mar 14 2018 1:25AM | Last Updated: Mar 14 2018 1:17AMमडगाव : प्रतिनिधी 

मठग्रामस्थांसह राज्यभरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत  जांबावली गुलालोत्सव मंगळवारी (दि.13) दुपारी उत्साहात पार पडला. श्रींच्या चरणी सेवा अर्पण करत भाविकांनी गुलालाची उधळण केली. गुलालाच्या रंगाने संपूर्ण देवस्थान परिसर रंगून गेला होता. भाविकांच्या श्री रामनाथ दामोदर महाराज की जय..! अशा जयघोषाने जांबावली नगरी दुमदुमली.  जांबावलीतील हा गुलालोत्सव गोव्यातील मुख्य उत्सवांपैकी एक असून त्यात गोव्याबरोबरच कर्नाटकातील असंख्य भाविकांनी भाग घेतला. दुपारी 3 वाजता श्री दामोदराची पालखी शिमग्याच्या मंडपात आल्यानंतर भाविकांनी श्री रामनाथ दामोदर महाराज की जय...असा जयघोष करीत पालखीवर गुलाल उधळला व त्यानंतर एकमेकांना गुलाल फासून आनंदोत्सव साजरा केला.

या उत्सवासाठी हजारो भाविक जांबावलीत उपस्थित असल्याने वाहतुकीवरही ताण आला होता. त्यामुळे काही ठिकाणी वाहनांच्याही रांगा लागलेल्या दिसल्या. श्री दामोदर हा मडगावचा ग्रामदेव, त्यामुळे मडगावातील भाविक मोठ्या संख्येने जांबावलीला गेल्याने सायंकाळी मडगावची बाजारपेठही ओस पडली होती. गुलालोत्सवात गुलाल उधळण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मडगाव, केपे, कुडचडे, कुंकळ्ळी, येथील एकूण 360 पोलिस मंदिर व परिसरात  तैनात करण्यात आले होते. केपे जंक्शनपासून वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन सदर मार्गावरील वाहतूक अन्य  मार्गावरून वळविण्यात आली होती. तसेच  खुल्या मैदानावर व देवस्थानच्या ठिकाणी  पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.  दुचाकी  व चार चाकी पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून मंदिर आवारात नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. 
c