Thu, Jul 18, 2019 05:00होमपेज › Goa › सरपंचांना वेतनवाढ, पेन्शन लागू करा

सरपंचांना वेतनवाढ, पेन्शन लागू करा

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMकाकोडा : वार्ताहर

गोवा विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी एकत्र येऊन एकमताने आपल्या मानधनात वाढ करून घेतली. त्याचप्रमाणे पंचायत  सदस्य, सरपंच यांच्या वेतनात वाढ करावी व पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी भाटी-सांगेचे सरपंच उदय नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. 

पंचायत प्रभाग मोठा असल्याने व तालुक्याचे ठिकाण लांब असल्याने सरकारकडून देण्यात येणारे अल्प वेतन बस तिकिटासाठीच अपुरे पडत आहे. गेल्या  बारा वर्षात वेतनात  वाढ केली नाही. वेतनवाढीसाठी सत्ताधारी व विरोधी आमदार एकत्र येऊन आपले वेतनवाढ करतात. मात्र त्यांना  पंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवकांची आठवण  होत नाही.  सरपंचांना मासिक 25 हजार रुपये वेतन आणि पेन्शन योजनाही लागू करावी, अशी  मागणी उदय नाईक यांनी केली.

रिवण सरपंच सूर्या नाईक म्हणाले, की सरकारने केवळ आमदार मंत्र्याचा विचार केला. वाढत्या महागाई पुढे देण्यात येणारे तीन ते चार हजार रुपये वेतन अपुरे पडत आहे. सरकारने या मागणीचा विचार करुन वेतनवाढ करावी. अन्यथा येणार्‍या लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिसाद नक्कीच उमटतील.

वाडे-कुर्डीचे सरपंच संज्योग पै म्हणाले, की सरकारकडून देण्यात येणारे वेतन हे गावात फिरून विकास कामे करण्यास अपुरे पडत आहे.  विधानसभेत वेतनवाढ विषयात सत्ताधारी व विरोधी आमदार एकसंघ झाले. तसाच पाठिंबा  सांगे भागातील सरपंचानी उठविलेल्या आवाजाला दिला पाहिजे.

आमदार पाच वर्षासाठी असतात मात्र पेन्शन मरेपर्यंत घेतात. नवीन नोकरी करणार्‍यांना आता पेन्शन नाही हा सरकारचा नियम आहे मात्र आमदारांना कशी काय पेन्शन दिली जाते यावर पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली. 

पत्रकार परिषदेला नेत्रावळी सरपंच रजनी गावकर, वाडे-कुर्डीचे उपसरपंच कुष्ठा गावकर, उगेचे सरपंच संजय परवार, पंचायत सदस्य परेरा व इतर पंचायतीचे पंचायत सदस्य उपस्थित होते.