Thu, Aug 22, 2019 08:42होमपेज › Goa › आयात मासळीवर आता करडी नजर : आरोग्यमंत्री 

आयात मासळीवर आता करडी नजर : आरोग्यमंत्री 

Published On: Aug 03 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 12:44AMपणजी : प्रतिनिधी

परराज्यातून  मासळी  आयातीवर  राज्य सरकारने लागू केलेली बंदी आज, शुक्रवारी (दि.3) संपुष्टात येत असून पुन्हा आयात सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे मत्स्योद्योग खाते,  पोलिस आणि वाहतूक खात्याच्या संयुक्‍त सहकार्याने आयात मासळीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. राज्यात फक्‍त पोळे आणि पत्रादेवी या दोनच ठिकाणांवरून मासळी आयात करण्यास मुभा दिली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राणे यांनी सांगितले की, राज्यात आयात करण्यात आलेल्या मासळीत फार्मेलिन हे घातक रसायन सापडल्याने पंधरा दिवसांची आयात बंदी जाहीर करण्यात आली होती. ही बंदी आता शुक्रवारपासून उठवण्यात आली असून शेजारील राज्यातून आयात करण्यात येणार्‍या मासळीबाबत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. राज्यात माशांची आयात फक्त दोनच चेकपोस्ट वरून करण्यास परवानगी देण्यात येणार असून गोवेकरांना आरोग्यपूर्ण अशी मासळी मिळावी म्हणून माशांच्या ट्रकांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. दक्षिण गोव्यात पोळे आणि उत्तरेत पत्रादेवी या चेकपोस्टवरून संयुक्त टीम तैनात करण्यात येणार आहे. एफडीचे पथक मध्यरात्री 12 ते 7 आणि सकाळी 7 ते दूपारी 3 पर्यंत मासळीच्या आयातीवर नजर ठेवतील. 

याबाबतचे सरकारी परिपत्रक पत्रकारांना दाखवताना राणे म्हणाले की, माशांच्या विके्रत्यांना व पूरवठदारांना यापूढे कडक नियम लागू होणार आहेत. परराज्यातून माशांची आयात करणार्‍या विक्रेत्यांना परिपत्रकाच्या पंधरा दिवसांच्या आत, एफडीएकडे नोंदणी आणि परवाना घ्यावा लागणार आहे. याशिवाय, परराज्यातील माशांची निर्यात करणार्‍या पुरवठादारांना त्या -त्या राज्यातील एफडीएचा परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर मासळी हवाबंद ट्रकातूनच वाहतूक करणे सक्तीचे केले जाणार आहे. एफडीएकडून परवाना नसलेल्या पूरवठादारांना पंधरा दिवसांनंतर आयात-निर्यात करण्यास बंदी घातली जाणार आहे. स्थानिक मासळी विक्रेत्यांनी घाऊकरीत्या माशांचा पुरवठा करणार्‍या पुरवठादारांनी सदर नियमांचे पालन करण्यास सांगावे . एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई आणि खात्याचे सचिव अशोक कुमार यावेळी उपस्थित होते.