होमपेज › Goa › वेड्या बहिणीची वेडी ही माया...

वेड्या बहिणीची वेडी ही माया...

Published On: Aug 28 2018 1:25AM | Last Updated: Aug 28 2018 12:27AMमडगाव : प्रतिनिधी 

जांबावली येथील मावस बहीण रूपा जांबवलीकर यांच्याकडे रक्षाबंधनासाठी आलेल्या दामोदर तिंबले या तरुणाचा बेळगावकडे परतताना इदलहोंड (खानापूर) जवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. आखातात जहाजावर नोकरीला असलेला दामोदर तिंबले पाच दिवसांपूर्वीच भारतात परतला होता.

प्राप्त माहितीनुसार दामोदर याची घरची परिस्थिती बेताची आहे. आई गृहिणी असून, वडील बेळगावात रिक्षा चालवून परिवाराचा चरितार्थ चालवतात. त्याला एक लहान भाऊ असून तो बेरोजगार आहे. दामोदरचे बालपण जांबावलीत गेले होते. आईसमान असलेल्या रूपा राजेश जांबावलीकर यांनी त्याला लहानाचा मोठा केला होता. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण जांबावलीत झाले होते. त्यानंतर रूपा यांनी त्याला एका एजंटकरवी जहाजावर नोकरीसाठी पाठवले होते.

पाच दिवसांपूर्वी भारतात परतलेल्या दामोदरने दाबोळी विमानतळावरून थेट बेळगाव गाठले होते. दोन दिवस आपल्या घरी मुक्काम केल्यानंतर तो आपल्या इतर मित्रांसोबत खास रक्षाबंधनासाठी जांबावलीत आता होता. गेले तीन दिवस जांबावलीकर यांच्या घरी त्याचा मुक्काम होता. या काळात आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याबरोबर श्री रामनाथ दामोदर मंदिरात जाऊन त्याने श्रींचे दर्शनसुद्धा घेतले होते. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.