Thu, Apr 25, 2019 07:25होमपेज › Goa › पिसूर्लेत धुमाकूळ घालणारा बिबटा जेरबंद

पिसूर्लेत धुमाकूळ घालणारा बिबटा जेरबंद

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:32AM

बुकमार्क करा
होंडा : वार्ताहर

पिसूर्ले देऊळवाडा भागात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणार्‍या  बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात अखेर वनखात्याच्या अधिकार्‍यांना यश आले.   सदर बिबट्याने  तीन दिवसांपूर्वी येथील दिनकर देसाई यांच्या मालकीच्या दोन गायींवर हल्ला केला होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. पिसुर्ले गावात वावरणार्‍या या  बट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे ,अशी   मागणी ग्रामस्थांनी वनखात्याकडे  केली होती.

वन खात्याच्या अधिकार्‍यांनी  या प्रकरणी तातडीने दखल घेऊन त्या भागात पिंजरा  लावून सापळा रचला होता.  पहिल्या दिवशी बिबट्याला  आकर्षित करण्यासाठी पिंजर्‍यात  कुत्र्या ऐवजी मांजर ठेवल्याने दोन दिवस सदर बिबट़ा पिंजर्‍यात अडकला नाही. याप्रकरणी जय श्रीराम गो शाळेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी  हस्तक्षेप करून वन खात्याच्या अधिकार्‍यांशी  संपर्क साधून सदर बिबट्याला  पकडण्यासाठी पिंजर्‍यात कुत्रा ठेवण्याचे आवाहन केले होते. वन खात्याच्या अधिकार्‍यांनी   शनिवारी रात्री  पिंजर्‍यात ठेवलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी  आला आणि बिबट्या जेरबंद झाला, असेे   परब यांनी सांगितले.

 सत्तरीत   वन खात्याकडे वाघ  पकडण्यासाठी एकच  पिंजरा आहे. तसेच वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने पिंजरा लावणे, पाळत ठेवणे कठिण जाते. पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला  जंगलातून बाहेर आणणे अडचणीचे होते.    दुर्घटना घडलेल्या शेतकर्‍यालाच व्यवस्था करण्यास सांगितले जाते. हा प्रकार योग्य नाही. सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून  वन्य जीवांना पकडण्यासाठी  सत्तरी वन खात्याकडे योग्य प्रकाराची साधन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हनुमंत परब यांनी केली आहे.  बिबट्याला पकडण्यात  वन खात्याला यश आल्याने  पिसूर्ले गामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.