Fri, Jul 19, 2019 17:46होमपेज › Goa › राज्यात संततधार

राज्यात संततधार

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:35AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले. पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को, फोंडा आदी शहरांसह ग्रामीण भागात पूरसद‍ृश स्थिती निर्माण झाली.   विविध ठिकाणी पडझडीमुळे वाहतूक कोंडी झाली. राज्यातील कुशावती, डिचोली, पार, वाळवंटी आदी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. आमठाणे, अंजुणे धरणांच्या पातळीतही वाढ झाली. दरम्यान, बांबोळी येथे रस्त्यात एवढे पाणी तुंबले की, स्थानिक नागरिकांनी चक्‍क होडीतून ये-जा केली.     

दरम्यान, मुसळधार पावसामुळे सत्तरीतील जनजीवन विस्कळीत झाले. साखळी-बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरात विविध ठिकाणी झाडे व दरडी कोसळल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली.

मडगावातील खारेबांद तसेच डिचोलीतील नानोडा भटवाडी आदी   सखल भागातील लोकवस्तीत पाणी घुसल्याने तेथील काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. विविध शहरांतील रस्ते तसेच महामार्गावरही अनेक ठिकाणी वाहने बंद पडून जनजीवन विस्कळीत झाले. मडगावात कोंब रेल्वे पुलाखाली पाणी तुंबल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. शाळकरी विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचार्‍यांना सकाळी भिजत जावे लागले. मडगाव-केपेला जोडणारा कुशावती नदीवरील गुडी- पारोडा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा बराच काळ खोळंबा झाला. उत्तर गोव्यात साखळी व डिचोलीत वाळवंटी नदी तसेच डिचोली आणि पार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली.  मात्र, संध्याकाळी पावसाचा जोर ओसरल्याने स्थिती नियंत्रणात आली.

पणजीत मळा, भाटले, ताळगावातील कामराभाट परिसरात अनेक घरांत पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याची हानी झाली. पणजी महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी गटारे खोलून पाण्यास वाट मोकळी करून दिली. मळा भागात पाणी खेचण्यासाठी पंपांचा वापर करण्यात आला. 

पणजी शहरात खुद्द मनपा इमारतीसमोर आणि 18 जून रस्त्यावर कमरेएवढे पाणी साचल्याने स्थानिकांबरोबर पर्यटकांचीही गैरसोय झाली. 18 जून रस्त्यावरील अनेक दुकानांत पाणी घुसल्याने व्यापार्‍यांना नुकसान सोसावे लागले. शहराच्या प्रवेशद्वारावर कदंब बसस्थानकाजवळ ते मिरामार रस्त्यापर्यंत पाणी तुंबले होते. दयानंद बांदोडकर मार्गावरील जुने सचिवालय, बाल गणेश मंदिर, कांपाल परेड मैदान, मिरामार सर्कल तसेच सांतईनेज चौक येथे जागोजागी साचलेल्या पाण्यातून चालक वाहने कशीबशी नेत होते. मिरामार-दोनापावला रस्त्यावर मातीमिश्रीत पाण्यातून जाताना चारचाकी वाहनांनाही त्रास झाला. सांतीनेज येथील काकुलो मॉलच्या मागील रस्त्यावर दोन ठिकाणी सांत इनेज खाडी दुथडी भरून रस्त्यावरून वाहू लागल्याने अनेक दुचाकी बंद पडल्या. बांबोळी येथील फुलांचा क्रॉस जवळील सिमेंटच्या रस्त्याशेजारील जुन्या रस्त्यावर  पाण्याचा अंदाज न आल्याने एका कारचालकाने गाडी थेट पाण्यात घातली.