Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Goa › राज्यात मुसळधार; आज अतिवृष्टीचा इशारा   

राज्यात मुसळधार; आज अतिवृष्टीचा इशारा   

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 21 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यभरात बुधवारी दिवसभर   मुसळधार पाऊस झाला. मान्सून गोव्यात पुन्हा जोमाने सक्रिय झाला असून, गोवा वेधशाळेने आज (दि.21) रेड अलर्ट जारी करून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासांत म्हापशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस राज्यभरात जोरदार पाऊस असेल, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक मोहन लाल साहू यांनी दिली.

पणजीतील सर्व सखल भागात पावसामुळे पाणी साचले आहे. बुधवारी अविश्रांत पडलेल्या पावसामुळे  मिरामार सर्कल, कदंब बसस्थानक, सांतइनेज, आझाद मैदान, 18 जून मार्ग, सांतिनेज सर्कल, मळा, कांपाल मैदान, ताळगाव, भाटले अशा अनेक  रस्त्यांवर  पाणी साचले. गटारे पाण्याने तुडुंब भरली होती व काही ठिकाणच्या गटारांतील पाणी रस्त्यावरून वाहत   होते. मळ्यातील पेट्रोल पंपाच्या ठिकाणीही पाणी साचले होते. संध्याकाळी पावसाने   जोर धरला. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांनी पावसातून कशीबशी वाट काढत घर गाठले.  वाहन चालविण्यास अडथळे निर्माण झाल्याने  काही  ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. 

वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, बुधवारी  दिवसभर पडलेल्या पावसानंतर पेडण्यात 5 इंच, वाळपई येथे  4  इंच,  फोंडा व एला (जुने गोवे) येथे प्रत्येकी 3 इंच,  साखळी, मुरगाव व केपे भागात प्रत्येकी 2 इंचाहून अधिक, पणजी व दाबोळी भागात प्रत्येकी 2 इंच तर काणकोण व मडगाव येथे प्रत्येकी 1 इंचाहून अधिक इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या 24 तासात राज्यातील कमाल तापमान 27.5  अंश सेल्सियस तर किमान 23 अंश सेल्सियस इतके आहे. वातावरणात 98 टक्के आद्रता आहे. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सांतइनेज येथे एका बांधकाम सुरू असलेल्या घरावर झाड पडले. मेरशी, सांताक्रुज , आल्तीनो व कुजिरा भागातही रस्त्यावर पडझडीचे प्रकार घडले.  

दरम्यान, समुद्रात 40 ते  45  प्रतीतास वेगाने वादळी वारे वाहत असून वादळाची तीव्रता 55 प्रतीतास एवढी वाढण्याचीही शक्यता आहे. प्रामुख्याने गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीत जोराचे वादळ वाहत आहे. समुद्र खवळलेला असून  येत्या 24 तासात मच्छीमारांनी समुद्रात  उतरू नये, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 

विमानसेवा ठप्प; 17 विमाने अन्यत्र वळवली, चार विमाने रद्द

वास्कोत बुधवारी  दिवसभर  मुसळधार  पाऊस झाला. हवामानातील बदलामुळे दाबोळी विमानतळावरील वाहतुकीवर परिणाम झाला. दाबोळी विमानतळावर उतरणारी 17 विमाने मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू आदी ठिकाणी वळविण्यात आली.चार ईंडिगो विमाने रद्द केल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण संचालक बीसीएच नेगी यांनी दिली.  

खराब हवामानामुळे विमाने अन्यत्र वळविण्यात आल्याने त्याचा फटका दाबोळी विमानतळावर आलेल्या प्रवाशांना बसला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने त्यांची राहण्याची तसेच खाण्यापिण्याची सोय केल्याने प्रवाशांचा गोंधळ दिसला नाही. इंडिगो (6 ई,329), दिल्ली-गोवा-दिल्ली,  हैदराबादकडे वळविण्यात आले. एअर इंडिया (एआय 156) दिल्ली-गोवा-दिल्ली, बेंगळुरूकडे वळविली. स्पाईस जेट (एसजी 3105, मुंबई-गोवा-मुंबई) बेंगळुरूकडे, इंडिगो (6 ई-31), मुंबई-गोवा, (इंडिगो 6 ई 905व 6ई 367 तसेच 6ई 634) सर्व विमाने हैदराबादकडे वळविण्यात आली. विस्तारा (युके- 847) एअर एशिया (इ775व 6 ई  779) ही विमाने बेंगळुरूकडे वळविण्यात आली.