Sun, Nov 18, 2018 14:23होमपेज › Goa › शिबिरात येणे शक्य नसलेल्यांना घरपोच सुविधा द्या

शिबिरात येणे शक्य नसलेल्यांना घरपोच सुविधा द्या

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:41AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

ज्या माजी सैनिकांना वैद्यकीय शिबिरात येणे शक्य नाही, त्यांना वैद्यकीय सुविधा घरपोच उपलब्ध करण्याची सुविधा करावी, अशी सूचना माजी सैन्यदल प्रमुख एस.एफ. रॉड्रिग्स यांनी मंगळवारी बांबोळी येथील माजी सैनिकांच्या वार्षिक मेळाव्यात  केली. अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  
रॉड्रिग्स म्हणाले, की शहीद जवानांच्या वीर पत्नीला निधी देताना तो समान पध्दतीने दिला जावा, यासाठी नियम करणे आवश्यक आहे. माजी सैनिकांसाठी समुपदेशन केंद्रांची आवश्यकता आहे. अशी केंद्रे सुरू करण्यासाठी आणि वैद्यकीय सुविधा माजी सैनिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी एरिया कमांडरनी पुढाकार घ्यावा.
माजी सैनिकांनी स्वावलंबी झाले पाहिजे. कोणावर अवलंबून राहू नये, आपल्या हक्कासाठी कोणासमोर हात पसरू नका. लष्कर आपला धर्म आहे आणि त्याचा विसर कधी पडू देऊ नका, असेही रॉड्रिग्ज म्हणाले. 

मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. मल्लखांब आणि पारंपरिक युध्द कौशल्ये जवानांनी सादर केली. हेडगेवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. आंबोली येथील सैनिक स्कूलच्या मुलांनी मल्लखांबाच्या चित्तथरारक कवायती करून दाखविल्या. यावेळी दहा वीरपत्नींचा गौरव रॉड्रिग्ज यांच्या हस्ते करण्यात आला. मेळाव्यास येऊ न शकलेल्या पाच वीरपत्नींचा त्यांच्या घरी जावून सन्मान करण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. मेळाव्यात आरोग्य तपासणी, सैनिकांचे रेकॉर्ड, पेन्शनबाबत असलेल्या तक्रारी निवारण्यासाठी बँकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील विविध भागांतील माजी सैनिक उपस्थित होते.

मेळाव्यास निवृत्त लेफ्टनंट कर्नल सी.ए. बार्रेटो, लेफ्टनंट जनरल विश्‍वंभर सिन्हा व ज्येष्ठ माजी सैनिक उपस्थित होते.