Sat, Jul 20, 2019 10:53होमपेज › Goa › पणजीत 10 रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

पणजीत 10 रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

Published On: Mar 03 2018 1:50AM | Last Updated: Mar 02 2018 11:49PMपणजी : प्रतिनिधी

पणजीत 10 मार्च रोजी होणार्‍या शिमगोत्सव मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मिरामार ते दोनापावल रस्त्यावर शिमगोत्सव मिरवणूक होणार आहे.त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. धर्मेश आंगले म्हणाले, की शिमगोत्सव मिरवणुकीला संध्याकाळी 4 वाजता सुरुवात होणार आहे. मिरामार ते सायन्स सेंटरपर्यंत चित्ररथ ठेवले जातील. शिमगोत्सव मिरवणूक हार्डली डेव्हिडसन्स शोरुमपर्यंत काढण्यात येईल.

बसस्थानक ते मिरामारपर्यंत दुपारी 2.30 पासून लोकांसाठी कदंब बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान डॉ. जॅक सिक्वेरा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. दोनापावलवरुन पणजी मार्गे येणार्‍या वाहनांना करंजाळेच्या अंतर्गत रस्त्याने वळविण्यात येईल. पणजीहून  दोनापावल मार्गे जाणार्‍या वाहनांना मिरामार सर्कलकडून टोंक-आदर्श सर्कल-सांतो मिंगेल हायस्कूल- ताळगाव चर्चच्या बाजूने विद्यापीठमार्गे वळविण्यात येईल. केवळ स्थानिकांना व प्रवासी बसगाड्यांना आदर्श सर्कलकडून दोनापावल येथे जाता येईल.

जे चित्ररथ शिमगोत्सवात सहभागी होणार आहेत त्यांनी वेळेच्या अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. मिरवणूक मिरामार येथून सुरू होत असल्याने एनआयओ सर्कलकडून पणजीत येणार्‍या चित्ररथांना प्रवेश दिला जाणार नाही.  सहभागी झालेल्या पथकांनी मिरामार सर्कलकडे उतरुन आपली वाहने एनआयओकडे पार्क करावीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. आदर्श सर्कल ते सायन्स सेंटर दरम्यानच्या मार्गावर केवळ व्ही.आय.पी गाड्यांसाठी पार्किंग असणार आहे. एसएजी मैदानावर पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.

शिमगोत्सवासाठी दक्षिण गोव्यातून येणार्‍या वाहनांनी शहरात प्रवेश न  कराता बांबोळी येथून गोवा विद्यापीठमार्गे येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनचालकांनी पर्यटन खात्याच्या जागेत वाहने पार्क करावीत. चित्ररथ मिरवणुकीच्या आवारात पार्क करण्यात आलेली वाहने त्या जागी न मिळाल्यास संबंधित वाहनधारकांना त्यांच्या गाड्या ताळगाव बायपास रस्त्यावर असलेल्या वसंत विहारजवळ मिळतील. कारण येथे पार्क केलेल्या सर्व गाड्या क्रेनव्दारे हलविण्यात येतील, याची लोकांनी नोंद घ्यावी, असेही आंगले यांनी सांगितले.