Tue, Jul 23, 2019 02:33होमपेज › Goa › दहावीचा निकाल 91.27 टक्के

दहावीचा निकाल 91.27 टक्के

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल 91.27 टक्के  लागला आहे. परीक्षेत मुलींची टक्केवारी 90.49 तर मुलांची 88.69 टक्के इतकी आहे. राज्यातील एकूण 390 पैकी  75  विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गेल्या सहा वर्षांत  निकालाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत असून 2017 सालचा निकाल 91.57 टक्के इतका होता,  अशी माहिती  शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी शुक्रवारी पर्वरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सामंत म्हणाले, 2  ते 21 एप्रिल 2018 या कालावधीत राज्यातील 27 केंद्रांमध्ये 10वी च्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदा एकूण 19 हजार 596 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 17 हजार 887 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून  यामध्ये 9 हजार 9 मुले तर 9 हजार 133 मुलींचा समावेश आहे. 

‘नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ)’  योजनेंतर्गत 2 हजार 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 297  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 8 हजार 451 विद्यार्थ्यांपैकी 376 विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ झाला आहे. 

क्रीडा गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 4.4 इतकी आहे, असेही त्यांनी सांगितले. 

उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन 1 जून रोजी केले जाणार आहे. 5 जून रोजी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी इमेलद्वारे पाठविण्यात येणार आहे. फेरमूल्यांकनासाठी 29 मे ते 7 जूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म उपलब्ध असतील. 15 जून रोजी राज्यातील 5 केंद्रांमध्ये  पुरवणी परीक्षा घेण्यात येतील. 

पत्रकार परिषदेला शिक्षण मंडळाचे सचिव भगिरथ शेट्ये, उचसचिव भरत चोपडे व सहाय्यक सचिव ज्योत्स्ना सरीन  उपस्थित होत्या.

विशेष मुलांच्या 4 शाळांचा निकाल 100 टक्के

विशेष विद्यार्थ्यांच्या 4 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात पर्वरी येथील संजय स्कूल, जुने गोवे येथील सेंट झेवियर अकादमी,  ढवळीतील लोकविश्‍वास प्रतिष्ठान  मिडल स्कूल  व लोकविश्‍वास प्रतिष्ठान, विराणी हायस्कूलचा समावेश आहे.