Fri, Jul 19, 2019 07:15होमपेज › Goa › समुद्रकिनारी पर्यटकांची मांदियाळी!

समुद्रकिनारी पर्यटकांची मांदियाळी!

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी  

उन्हाळी सुट्टीमुळे देशी पर्यटकांचा कल गोव्याकडे वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्‍ली, कर्नाटक  या राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाल्याची माहिती पर्यटन खात्याच्या सूत्रांनी दिली.  एप्रिल व मे महिन्यात  सलग चार दिवस सुट्टी आल्यानेही  पर्यटकांची  संख्या  वाढण्यास मदत झाली.  सुट्टीचा आनंद लुटण्याबरोबरच  उकाड्यापासून  दिलासा मिळवण्यासाठी विविध  किनार्‍यांवर पर्यटक गर्दी करीत असून समुद्रस्नानाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

गोवा पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ खासगीच नव्हे तर  गोवा पर्यटन विकास महांमडळाचे  विशेषतः  किनारी भागांतील रेसिडेन्सींमध्ये पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात बुकींग केले जात आहे. पणजीतील सांतामोनिका जेटीवरील   क्रुझ बोटींव्दारे जलसफरीचा आनंद लुटणे, पर्यटन खात्याच्या हॉप ऑन  हॉप ऑफ  बसेसद्वारे राज्यातील पर्यटन स्थळांना भेटी देणे, साहसी जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठीही  पर्यटक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.  

देशी पर्यटकांच्या संख्येत मे अखेर पर्यंत अधिकच भर पडण्याचीही पर्यटन खात्याची अपेक्षा आहे.  उन्हाळी सुट्टीत  विदेशी पर्यटकांची  संख्या देशी पर्यटकांच्या  तुलनेत कमी असली तरी  पर्यटन हंगामात ऑक्टोबर ते  मार्च अखेर पर्यंत  808 चार्टर विमानांव्दारे  2 लाख 15 हजार 41 विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. यात   रशियाहून आलेल्या  537 चार्टर विमानांव्दारे 1 लाख 44 हजार 722 विदेशी पर्यटक, इंग्लंडच्या  171 चार्टर विमानांव्दारे 48 हजार100, कझाकिस्तानच्या  47 चार्टर विमानांव्दारे 10 हजार 876, युक्रेनच्या  37  चार्टर विमानांव्दारे 8 हजार 904, इराणच्या  3 चार्टर विमानांव्दारे 92 तर  फिनलैंडच्या 3 चार्टर विमानांव्दारे  2 हजार 347 विदेशी पर्यटक दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.