गोव्यात म्हापसातील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा

Last Updated: Jun 02 2020 2:05PM
Responsive image


पणजी : वृत्तसेवा     

एकाच परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा प्रकार गोव्यात सुरूच  असून दक्षिण गोव्यातील मांगोरहिल - वास्को या दाट वस्तीत सोमवारी (१ जून) सहा जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले होते. यात भर म्हणून मंगळवारी (२ जून) उत्तर गोव्यातील म्हापसा - काणका या परिसरात एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे. या दोन्ही प्रकरणातील काही कुटुंब सदस्य महाराष्ट्र राज्यातून प्रवास करून आलेले असल्याने गोमंतकीयांमध्ये सामाजिक संसर्ग निर्माण होण्याची  भीती पसरली आहे.

मांगोरहिल येथे एका कुटुंबातील पााचजण आणि त्या कुटुंबातील व्यक्तीवर उपचार करणारे एक डॉक्टर अशा सहा जणांचा सोमवारी कोरोनाचा प्राथमिक अहवाल  ‘पॉझिटिव्ह’ सापडला होता. या कुटुंबातील व्यक्ती व त्याची पत्नी मासळी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने आणखी काही लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. सदर परिसरातील डॉक्टराने या व्यक्तीला तपासल्यानंतर त्याची चाचणी करण्यासाठी गोमेकॉत पाठवणी केली होती. या डॉक्टराने किती लोकांना त्यानंतर तपासले याची माहिती घेतली जात आहे. या व्यक्तीचा एक मुलगा कोलवा येथील पोलिस स्थानकावर कॉन्स्टेबल म्हणून काम करत असल्याने सदर पोलिस स्थानकातील सर्व पोलिसांची कोरोना चाचणी केली जात आहे. मांगोरहिल परिसर सध्या पोलिसांनी सील केला असून सर्व प्रवेश व बाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. या भागातील सर्व लोकांची कोरोना चाचणी सध्या सुरू आहे. 

यानंतर असेच दुसरे प्रकरण म्हापसा - काणका भागात उघडकीस आले असून एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे प्राथमिक अहवालात सिद्ध झाले आहे. या कुटुंबातील एक पुरूष व दोन लहान मुलांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला असून या मुलांची आईचा अहवाल मात्र ‘निगेटिव्ह’ आला आहे. हे कुटुंबही महाराष्ट्रातून आले असून ते आणखी कुणाला भेटले आहे त्याची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.