गोवा : प्रतिनिधी
म्हादई पाणी प्रश्नावरून कर्नाटकमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या गुरुवारी कर्नाटकमध्ये धावल्या नाहीत. त्यामुळे गोव्याहून बेळगाव, हुबळी, धारवाड आदी भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गोव्याच्या काही खासगी वाहनांवर कर्नाटकमध्ये दगडफेक झाली आहे.
कदंब वाहतूक महामंडळाने बुधवारपासूनच कर्नाटकमधील आपली प्रवासी बससेवा थांबवली आहे. फक्त बुधवारी रात्री गोव्याहून बंगळुर व म्हैसुरला कदंबच्या दोन बसगाड्या सोडण्यात आल्या. त्या आज पहाटे तिथे दाखल झाल्या. गोव्याहून कदंबच्या अन्य बसगाडय़ा गेल्या नाहीत. गोव्याहून जी खासगी वाहने कर्नाटकमध्ये जात होती, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली. अनेक गोमंतकीयांनी गुरुवारी कर्नाटकमध्ये आपली खासगी वाहने न जाणेच पसंत केले. कर्णाटकातील बंदमुळे हजारो प्रवासी कदंब बस स्थानक व अन्यत्र अडकून पडले.