Tue, Jul 23, 2019 19:07होमपेज › Goa › पोलिसाला हिरो बनण्याचे स्वप्न पडले महागात!

पोलिसाला हिरो बनण्याचे स्वप्न पडले महागात!

Published On: Dec 07 2018 3:25PM | Last Updated: Dec 08 2018 1:20AM
पणजी: पुढारी ऑनलाईन

बॉलीवूडचे जग पाहता बहुतांश लोक  हिरो बनण्याचे स्वप्न पाहत असतात. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेजण मुंबई गाठतात. त्यामध्ये काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी अपयश पडते. तर कहीजण असे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागतात. असाच एक किस्सा गोव्याची राजधानी पणजी येथे घडला आहे.

गोवा दहशतवाद विरोधी पथकाचे कॉन्स्टेबल अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचे स्वप्न पाहत २०१६ पासून ड्यूटीवर गैरहजर आहे. विभागाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा  प्रयत्न केला पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचे स्वप्न उराशी बाळगुण तो मुंबईमध्ये गेला असल्याचे सांगितले आहे.  मात्र, त्याच्या गैरवर्तनामुळे त्याने नोकरी गमावल्याची माहितीदेखील अधिकांऱ्यांनी दिली आहे.

रोहन एक्के असे या कॉन्स्टेबलचे नाव असुन तो २०१६ पासून ड्यूटीवर गैरहजर आहे. एक्के आपले भवितव्य सिनेसृष्टीत आजमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या बेजबाबदारपणामुळे त्याला अनेकदा नोकरी संदर्भात संधी दिली आहे. पण तो कोणाशी संपर्क न ठेवता २०१६ पासून गायब झाला आहे. 

एटीएस एसपी कार्तिक कश्यप यांनी सांगितले की, २०१६ पासून एक्केशी आमचा कोणताच संपर्क नाही. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे. एक्के मुंबईला गेले असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, १९७५ मध्ये गोवा सर्व्हिस नियम अस्तित्वात आला. या सर्व्हिस रूलमधील कलम २२ अंतर्गत न सांगता कामावरून गायब राहिल्यास संबंधीत व्यक्तीला कामावरून काढून टाकण्याची तरतुद केली आहे. याच पार्श्वभूमीवर  एक्के याला कामावरून पळून गेले असल्याचे घोषित केले आहे.  

एक्के याला कामावरून काढून टाकल्याची  नोटिस त्याच्या घरी पाठवण्यात आली होती. त्यावेळी समजले की, तो घर सोडुन निघून गेला आहे. कश्यप म्हणाले अनेकदा त्यांना संधी दिली होती पण एक्के यांच्या अशा गैरवर्तनामुळे त्याची कामावरून गच्छंती करण्यात आली आहे.