Fri, May 24, 2019 01:18होमपेज › Goa › पीडित युवती बेपत्ता प्रकरणी चौकशीचे आदेश : मुख्यमंत्री

पीडित युवती बेपत्ता प्रकरणी चौकशीचे आदेश : मुख्यमंत्री

Published On: May 16 2019 2:04AM | Last Updated: May 16 2019 2:04AM
पणजी : प्रतिनिधी 

बाबूश मोन्सेरात बलात्कार प्रकरणातील पीडित युवती बेपत्ता झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  या चौकशीच्या माध्यमातून सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईल, असे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युवतीच्या बेपत्ता  प्रकरणाची  सखोल  चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी  सांगितले. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, मोन्सेरात  बलात्कार प्रकरणातील पीडित युवती ही  ही पुनर्वसन केंद्रात  बाल कल्याण समिती(सीडब्ल्यूसी)च्या ताब्यात होती. तिच्या बेपत्ता होण्याप्रकरणी  पुनर्वसन केंद्र, ती ज्या महाविद्यालयात जायची तिथे तसेच  अन्य आवश्यक गोष्टींचा तपास केला जाणार असल्याचे त्यांनी  सांगितले.  या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले  आहेत, त्यामुळे ही युवती गायब झाली, तिचे अपहरण झाले, की आणखी काय 0झाले,या चौकशीतूनच खरे काय ते समोर येईल,असे ते म्हणाले.

पीडित युवतीला शोधून काढले जाईल. या चौकशीवर आपण लक्ष ठेवून असून नियमितपणे  अहवाल मागवून  या प्रकरणाची प्रगती जाणून घेत असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मोन्सेरात बलात्कार प्रकरणातील पीडित युवती   पुनर्वसन केंद्रातून बेपत्ता झाल्याने   सध्या खळबळ उडाली आहे.   काँग्रेस तसेच भाजपकडून या विषयावरून एकमेकांवर सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.  सदर युवती  एप्रिल महिन्याच्या अखेरीस पासून बेपत्ता असल्याचे  म्हटले जात आहे.