Tue, Jul 16, 2019 02:15होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेस रवाना

मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेस रवाना

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 11 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शुक्रवारपासून (दि.10) स्वादुपिंडावरील उपचारासाठी अमेरिकेला जात असून ते 17 ऑगस्ट रोजी परतणार आहेत. पर्रीकर 10 ते 17  ऑगस्ट या कालावधीत जनतेसाठी अनुपलब्ध असतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातून पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत राज्याच्या प्रशासकीय कामाची धुरा प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती सांभाळतील व त्यांना मुख्य सचिव धर्मेश शर्मा साहाय्य करतील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर न्यूयॉर्कमधील खासगी इस्पितळात 8 मार्चपासून उपचार घेत होते. तीन महिन्यांच्या उपचारानंतर ते 14 जून रोजी गोव्यात दाखल झाले होते. आता दुसर्‍या टप्प्यातील उपचारासाठी गुरुवारी (दि.9) संध्याकाळी ते अमेरिकेला जाण्यासाठी दाबोळी विमानतळावरून मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर असून, 13, 14 व 15 ऑगस्ट असे तीन दिवस पर्रीकरांवर अमेरिकेत उपचार होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र पाठवून आपल्या अमेरिका दौर्‍याबाबतची माहिती  दिली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव कृष्णमूर्ती मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासकीय फाईल्स हाताळणार आहेत. यासंबंधीचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्रीकर यांनी मागील वेळी अमेरिकेला जाताना राज्यातील प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची त्रिमंत्री समिती स्थापन केली होती. यावेळी त्यांनी कोणालाही हंगामी मुख्यमंत्रिपद न देता, अथवा सल्लागार समिती स्थापन न करता आपणच अमेरिकेतून नियमितपणे राज्यातील अधिकार्‍यांशी फोन किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधून प्रशासन हाताळणार असल्याचे राज्यपालांना कळविले आहे. 

स्वातंत्र्यदिनी  सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण

येत्या  15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणार्‍या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पहिल्यांदाच गैरहजर राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या सरकारी निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव टाकण्यात आले आहे. सावंत पणजी येथील जुन्या सचिवालयासमोर होणार्‍या शासकीय कार्यक्रमात झेंडा फडकवणार आहेत. याविषयी सावंत यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्याला ही संधी दिल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत असल्याचे सावंत यांनी सांगितले.