Sun, May 26, 2019 16:45होमपेज › Goa › ‘उत्तम गोव्या’साठी नेतृत्व घडविण्याची मनीषा : पर्रीकर

‘उत्तम गोव्या’साठी नेतृत्व घडविण्याची मनीषा : पर्रीकर

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 12:25AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यासाठी समर्पित भावनेने काम करणारे आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व विकसित करण्याची आपली मनीषा  आहे.  हे नेतृत्व  भाजप, काँग्रेस किंवा अशा राजकीय पक्षातून घडवणे अभिप्रेत नाही. पक्षविरहित,‘उत्तम गोवा’साकार करू शकणारे असे हे नेतृत्व असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

स्थानिक माध्यमांच्या संपादकाशी पर्वरीतील मंत्रालयात मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गुरुवारी अनेक  विषयांवर अनौपचारिक वार्तालाप केला. त्यावेळी ते बोलत होते. 
ते म्हणाले, की मूल्य शिक्षणावर भर देण्याचे आपण ठरवले आहे. आपल्याकडून काही चूक झाली तर त्याबद्दल आपल्याला अपराधी  वाटते हे मूल्य आहे. अशा मूल्याचा बोध करून देणे महत्त्वाचे आहे. गोयकारपण ही आपली ओळख आहे. प्रेम , आपुलकीची भावना तीत दडलेली आहे.  कौटुंबिक मूल्ये ही देखील जपली पाहिजेत. भविष्यात शाळांतून संस्कार व मूल्याचे शिक्षण देण्यावर आपला भर राहील.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या बाहेर उघड्यावर अन्नपदार्थ शिजविले जातात. हे अनारोग्यकारक आहे. शहाळी विकणारे त्यांची शकले तशीच टाकून देतात. त्यातून मलेरिया डासांची पैदास होऊन रोगाचा फैलाव होऊ शकतो. हे किती गंभीर आहे. अन्न व औषध प्रशासनाला त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले आहेत. स्थानिक पंचायत त्यांच्या कारवाईत अडथळे आणते, हे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.

उपचारासाठी अमेरिकेला जायचे निश्‍चित झाले, तेव्हा आपली काय भावना झाली या प्रश्‍नावर काहीसे भावूक होऊन मुख्यमंंत्री म्हणाले, की लवकरात लवकर बरे होऊन परतण्याचाच मनाचा निश्‍चय होता. आत्मविश्‍वासही होता.आपण घाबरलो मात्र मुळीच नव्हतो, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.