Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Goa › ‘गोवा माईल्स’अ‍ॅप सुरू केल्यास टॅक्सी अडवू

‘गोवा माईल्स’अ‍ॅप सुरू केल्यास टॅक्सी अडवू

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMमडगाव : प्रतिनिधी

विरोध झालेल्या ओला आणि उबेर सारख्या कंपन्यांना मागील दारातून राज्यात प्रवेश देण्याकरिता सरकार टॅक्सीसाठी ‘गोवा  माईल्स’ हे अ‍ॅप लादू पाहत असून या अ‍ॅपमुळे राज्यातील स्थानिक टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. सरकारने राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात न घेता हे अ‍ॅप सुरू केल्यास त्या टॅक्सी आडवू, असा इशारा दक्षिण गोव्यातील विविध टॅक्सी संघटनांनी रविवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. दक्षिण गोवा टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष विंसी कार्व्हालो, गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर, बेर्नाड फर्नांडिस, फुकरन शहा व इतर टॅक्सी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विंसी कार्व्हालो म्हणाले, की अ‍ॅपबद्दल सरकारने टॅक्सी मालकांना अंधारात ठेवले आहे. काही मोजक्या व्यावसायिकांसाठी हा अ‍ॅप आणला जात असून किनारपट्टी भागातील टॅक्सी मालकांना विश्‍वासात न घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व संबंधित घटक आणि भागधारकांना विश्वासात घेऊन पुढील कृती केली जाईल. गोवा मोठे राज्य नाही. इतर राज्यातील मोठमोठ्या शहरांप्रमाणे इथे मोठी बाजारपेठ नाही. त्यामुळे या अ‍ॅपचा गोव्याला काहीच फायदा होणार नाही.

अ‍ॅप कोणाच्यातरी लाभासाठी गोव्यात आणला जात आहे. किनारपट्टी भागात नवीन हॉटेल प्रकल्पांना विरोध केला जात होता. कचरा व्यवस्थापन, पुन्हा पुन्हा खंडित होणारी वीज अशा अनेक कारणांमुळे विरोध वाढत चालला होता. अशा वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करताना या प्रकल्पातून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लोकांनी आपले पारंपरिक धंदे सोडून टॅक्सी व्यवसाय स्वीकारला. पण  अ‍ॅप आल्यामुळे परिणाम होणार आहे. या अ‍ॅपबद्दल टॅक्सी मालकांना कोणीही माहिती पुरवली नाही. किनारपट्टी भागात कोणत्याही कटकटीशिवाय टॅक्सी मालक व्यवसाय करीत आहेत. सरकारने हा अ‍ॅप आणून येथील शांतता बिघडवू नये. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व चाळीसही आमदार ज्याप्रमाणे एकत्र आले आहेत, तसेच त्यांनी टॅक्सी व्यवसायासाठी एकत्र यावे.

अ‍ॅपच्या माध्यमातून पर्यटकांना घेऊन टॅक्सी किनारपट्टी भागात आल्यास त्या अडवल्या जातील. कोणताही प्रकल्प आल्यास स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल. तसेच 80 टक्के रोजगार दिला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने आम्हाला विश्‍वासात घेण्याची गरज होती. मीटरनुसार  भाडे आकारण्याचा राजपत्रीय आदेश काढण्यात आला होता, पण हा नियम लगेच बदलण्यात आला. प्रत्येक वर्षी भाड्यात वाढ होणे गरजेचे होते, ती झालेली नाही. सरकार टॅक्सी चालकांवर अन्याय करत आहे, असे फर्नांडिस म्हणाले. 

उत्तर आणि दक्षिण गोवा टॅक्सी मालक संघटना एकत्र येऊन याविषयी चर्चा करणार आहेत. सरकार स्थानिकांचा टॅक्सी व्यवसाय मोडीत काढू पहात आहे. स्थानिक टॅक्सीवाल्यांकडे एकच वाहन आहे. त्याद्वारे आम्ही व्यवसाय करीत आहोत. सरकारने या अ‍ॅपच्या मागे न धावता आम्हाला मदत करावी. अ‍ॅपच्या माध्यमातून कोणी येऊन व्यवसाय करणार, त्यात गुन्हेगारी प्रवृत्तींचाही समावेश असू शकतो, असेही विंसी कार्व्हालो यांनी सांगितले. 

परशुराम सोनुर्लेकर म्हणाले की, ‘गोवा माईल्स’ अ‍ॅपला गोवा फर्स्ट ही संघटना पूर्वीपासून विरोध करत आहे. काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी हा खटाटोप सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.