Sun, Jul 21, 2019 12:05होमपेज › Goa › मांडवीत बार्जेस नांगरून जलमार्ग रोखणार : डिसा

मांडवीत बार्जेस नांगरून जलमार्ग रोखणार : डिसा

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 18 2018 12:59AMदाबोळी : वार्ताहर

खाण अवलंबितांच्या सोमवारी होणार्‍या शक्‍तिप्रदर्शनाला पाठिंबा म्हणून गोवा बार्जमालक संघटना आपल्या बार्जेस मांडवी नदीत नांगरून जलमार्ग रोखणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रेमंड डिसा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

डिसा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यात खाण बंदीचा आदेश दिल्यानंतर 16 मार्चपासून राज्यातील सर्व खनिज खाणी बंद झाल्या असून, याचा बार्ज व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आता खाण लिजांच्या लिलावानंतरच खाण व्यवसाय सुरू होणार आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकार यांच्या निर्णयानुसार खाणींचा लिलाव झाल्यास नवीन खाणमालक येत त्यांनी नवीन बार्जेस सेवेत घेतल्यास आमच्या बार्ज व्यवसायावर गदा येण्याची शक्यता आहे. 2012 मध्ये खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर बार्ज व्यावसायिकांची स्थिती बिकट झाली आहे. कर्जाचे ओझे अजून कमी झाले नाही. याउलट नवीन समस्या निर्माण होत आहेत. सरकारने बार्ज व्यावसायिकांसाठी सुरु केलेल्या बँक योजनेचा कार्यकाल 31 मार्चला संपत असून ती योजना पुढेही सुरू ठेवावी, जेणेकरून बार्ज व्यावसायिकांना दिलासा मिळेल.

बार्ज मालकांवर अजूनही कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे कित्येक जणांना आरोग्याची समस्या भेडसावत आहे. सरकारने यावर योग्य तो निर्णय घ्यावा. केंद्र सरकारनेही लवकरात लवकर तोडगा काढून समस्यांचे निवारण करावे, असे रेमंड डिसा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत संघटनेचे सचिव सुयोग नाईक, चंद्रकांत गावस, माजी अध्यक्ष अतुल जाधव, मनुभाई टक्कर, रमाकांत खडपकर, राहुल नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.