Tue, Jun 18, 2019 21:01होमपेज › Goa › पणजी मार्केट परिसरातील कचरा प्रकल्प हटवणार नाही

पणजी मार्केट परिसरातील कचरा प्रकल्प हटवणार नाही

Published On: Apr 18 2018 12:48AM | Last Updated: Apr 17 2018 11:26PMपणजी : प्रतिनिधी

पणजी मार्केट संकुलन परिसरातील कचरा प्रकल्प हटवण्यात येणार नाही. या प्रकल्पासंदर्भात पाहणी अहवाल तयार केला जाईल. प्रकल्पातील कचरा हाताळण्यासाठी नव्याने कंत्राट जारी केले जाणार आहे, असे सांगून पणजी महानगरपालिकेचे आयुक्‍त अजित रॉय यांनी मंगळवारी पार पडलेल्या मनपा बैठकीवेळी मार्केट परिसरातून हा कचरा प्रकल्प हटवण्याची केलेली मागणी फेटाळून लावली. बैठकीत मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणार्‍या सुमारे 215 रोजंदारीवरील कामगारांच्या प्रतिदिन पगारात 323 रुपयांवरुन 500 रुपये इतकी वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

नगरसेवक उदय मडकईकर म्हणाले, की पणजी मार्केट परिसरातील कचरा प्रकल्पातून येणार्‍या दुर्गंधीमुळे तेथील व्यापार्‍यांना फटका बसत आहे. या प्रकल्पात इतकी अस्वच्छता आहे, की काहीजण आजारी पडून मृत देखील पावले आहेत. त्यामुळे सदर प्रकल्प तेथून त्वरित हटवावा, अशी मागणी दुकानदार करीत आहेत. सदर प्रकल्प त्वरित दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात यावा. तेथील कचरा हाताळणार्‍या बीव्हीजी कंपनीकडून व्यवस्थित काम केले जात नाही. कंत्राटाचे नूतनीकरण करण्याऐवजी ते अन्य कंपनीला कंत्राट द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

आयुक्‍त रॉय म्हणाले, की या कचरा प्रकल्पातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार यापूर्वी आली नव्हती. मागील एका आठवड्यापासून ही तक्रार  येत असून त्याबाबत पाहणी केली जाईल. मात्र, हा प्रकल्प तेथून हटवण्यात येणार नाही. या प्रकल्पातील कचरा हाताळण्याचे काम बीव्हीजी कंपनीकडून केले जात आहे. या कंपनीचे कंत्राट 31 जुलैपर्यंत वाढवण्यात येईल. या काळात अन्य कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागवून योग्य त्या कंपनीला नव्याने कंत्राट दिले जाईल.

मनपाची  घनकचरा व्यवस्थापन  समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये सत्ताधारी व विरोधी गटाच्या प्रत्येकी तीन नगरसेवकांचा समावेश असणार आहे. मनपाच्या कामगारांकडून शनिवार, रविवारी या सार्वजनिक सुट्टीदिवशी घरोघरी जाऊन कचर्‍याची उचल केली जात नसल्याच्या तक्रारी काही नगरसेवकांकडून करण्यात आल्या होत्या. यासाठी मागील आठवड्यात आपण स्वत: जाऊन पाहणी केली, असता त्यात तथ्य आढळून आले. त्यानुसार कचरा उचल करणार्‍या मनपाच्या कायमस्वरुपी कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच रोजंदारीवरील कामगारांचा दोन दिवसांचा पगार कापण्यात आला असल्याचेही रॉय यांनी सांगितले.

Tags : goa news, garbage project in Panaji Market area will not be deleted