Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Goa › बाप्पांचे आज आगमन

बाप्पांचे आज आगमन

Published On: Sep 13 2018 1:43AM | Last Updated: Sep 13 2018 12:47AMपणजी : प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया असे म्हणत विघ्नहर्त्या गणेशाचे राज्यात जल्‍लोषात (गुरुवारी)आज आगमन होत आहे.  भक्‍तांचा उत्साह देखील जोरदार आहे. मंगलमय वातावरणात आज घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे.

राज्यात  घरोघरी  गणेशमूर्तींच्या आगमनास    बुधवारीच सुरुवात झाली होती.  राज्यातील विविध पोलिस स्थानक, सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही जल्लोषात सर्वांच्या लाडक्या विघ्नहर्त्याचे आगमन झाले असून आज पूजन होणार आहे. 21 मोदकांच्या नैवेद्याचा सुवास आज घरोघरी दरवळणार  आहे.  राज्यात  चतुर्थी उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार असून काही घरात  दीड दिवस, पाच, सात, नऊ  दिवस गणेश चतुर्थी साजरी करण्यात येईल. सार्वजनिक मंडळांचे गणेशोत्सव अकरा दिवस चालणार आहेत. 

घरापासून कामानिमित्त  लांब असलेली   कुटुंबे या शुभवेळी एकत्र आली आहेत. गणेशोत्सवाचा मुळात प्रारंभही सामाजिक भान निर्माण व्हावे व लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव व आनंद साजरा करावा, या हेतूनेच लोकमान्य टिळकांनी केला होता.  गणेशोत्सवाची परंपरा व हा कधी  न चुकलेला वारसा लोक उत्साहाने साजरा करीत आहेत.

पुढील काही दिवस टाळ, मृदंगाच्या आरत्यांनी गणरायाचे पूजन होणार आहे. तसेच घरा-घरांमधून लोक आपल्या लाडक्या  विघ्नहर्त्याला आपल्या कुटुंबाला सुख शांती लाभून प्रगती होवो, असे गार्‍हाणे  घालणार आहेत. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी 11.03 पासून 1.30 वाजेपर्यंत   भाविक करू शकतात. सूर्योदयापासूनही भाविक गणेशमूर्तीची स्थापना करू शकतील, तसेच या वेळेत भक्त पूजा करू शकतात.  
 

दरम्यान,राज्यात मान्सून कमजोर झाला असल्याने   गणरायाच्या आगमनावेळी  यंदा पावसाची अपेक्षा नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात सरासरी  93 इंचांवर पाऊस  थांबला असून पावसाची तूट 15 टक्क्यांवरून वाढून 17 टक्क्यांवर पोचली आहे. तापमानात उष्णता वाढली असून कमाल तापमान 31 अंश सेल्सियस इतके असल्याची माहिती गोवा वेधशाळेने दिली.