Fri, Apr 26, 2019 04:10होमपेज › Goa › माजी आयुक्‍त देसाईंकडून न्यायालयाला खोटी माहिती

माजी आयुक्‍त देसाईंकडून न्यायालयाला खोटी माहिती

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:57AMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेचे माजी आयुक्‍त दीपक देसाई यांनी मार्केटमधल्या बेकायदेशीर व्यावसायिकांवर कारवाई  न करता न्यायालयाला खोटी माहिती पुरवली असल्याचा आरोप माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केला.

पणजी मार्केटातील नव्या घोटाळ्याची माहिती देताना फुर्तादो म्हणाले, की पणजी मनपाच्या मालकीचे असलेल्या मार्केटातील अंदाधूंदी कारभार आणि बेकायदेशीर व्यवहाराला कंटाळून पणजीतील अलॅविन मायकल डिसा व अन्य पाच जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात 2014 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेला उत्तर देताना तत्कालीन मनपा आयुक्त दीपक देसाई यांनी मार्केटातील सुमारे 471 अनाधिकृत व्यापार्‍यांना नोटीस पाठवून त्यातील 22 दुकानांना सील ठोकले असल्याचे नमूद करून ही दुकाने मनपाच्या ताब्यात असल्याचे डिसा यांनी  7 मे 2018 रोजी माहिती हक्क कायद्याखाली किती व कुठली बेकायदेशीर दुकाने मनपाने  पंचनामा करून व सील ठोकून ताब्यात घेतली. त्याला 5 जून 2018 रोजी उत्तर देताना माजी आयुक्त देसाई यांनी आपण एकही दुकानाला सील ठोकले नसल्याचे उघड केले होते. याचा अर्थ देसाई यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली असून त्यांना याप्रकरणी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दावा गुदरणार असल्याचे फु र्तादो म्हणाले. 

आपण महापौर असताना माजी आयुक्त देसाई यांना पाठवलेल्या ‘नोट’मध्ये मनपाने बेकायदेशीर दुकानांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यात आयुक्त देसाई यांनी मनपा मंडळाला विश्‍वासात न घेता 25 दुकानदारांची प्रकरणे हातावेगळी केल्याबद्दल विचारणा केली होती. सदर 25 दुकानांचा कोणताही पंचनामा न करता मनपाने ती ताब्यात कशी घेतली असा प्रश्‍नही उपस्थित केला होता, असे त्यांनी सांगितले. मनपाचे भाड्यापोटी सुमारे 15 कोटी रूपये थकबाकी असून मार्केट दुकानदार ती भरण्यास टाळाटाळ करत असले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही.  देसाई सारख्या कामचुकार सरकारी अधिकार्‍यांची मुख्य सचिव धर्मेश शर्मा यांनी चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी फुर्तादो यांनी केली आहे.