Sun, Apr 21, 2019 01:54होमपेज › Goa › ‘मोपा’ स्थगितीसाठी न्यायालयात जाणार

‘मोपा’ स्थगितीसाठी न्यायालयात जाणार

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 22 2018 12:35AMपणजी : प्रतिनिधी

मोपा विमानतळ प्रकल्पाला स्थगिती मिळावी यासाठी लवकरच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येणार आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्‍ला घेतला जात असल्याचे ‘गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली’चे निमंत्रक एरमितो  रिबेलो यांनी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले.

मोपा हा केंद्र सरकारचा प्रकल्प नाही. मात्र, मोपा प्रकल्पाची केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी  पाहणी केली. मंत्री प्रभू यांचा या मागे नक्‍की काय उद्देश आहे,  असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

रिबेलो म्हणाले की, प्रस्तावित मोपा प्रकल्प हा केंद्र सरकारचा नसून  या संदर्भात गोवा सरकार व जीएमआर कंपनीमध्ये करार झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री प्रभू यांनी नुकतीच मोपा प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मोपाबरोबरच दाबोळी विमानतळदेखील कार्यरत राहिल, मोपामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मोपा हा केंद्र सरकारचा प्रकल्प नसल्याने मंत्री प्रभू यांनी याठिकाणी भेट देण्याचा हेतू काय, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

गोव्यात एकावेळी एकच विमानतळ कार्यरत राहणार असा अहवाल तज्ज्ञांनी दिला असताना मंत्री प्रभू मात्र दोन्ही  विमानतळे सुरु राहतील, असे सांगत आहेत. मोपा, बेळगाव व चिपी असे तीन विमानतळ 150 किलोमीटर अंतरावर असताना मोपा विमानतळावर प्रवाशांची संख्या कशी वाढणार? कदाचित मोपा विमानतळामुळे सिंधुदुर्ग येथील पर्यटनाला चालना देण्याचा मंत्री प्रभू यांचा हेतू असेल, असा आरोपही त्यांनी  केला.

 

Tags : goa, panaji news, Mopa Airport project, stay, court,