Sat, Mar 28, 2020 23:04होमपेज › Goa › बोरीत बिबट्या अखेर जेरबंद

बोरीत बिबट्या अखेर जेरबंद

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:44AM

बुकमार्क करा

फोंडा ः वार्ताहर 

सुकन्या-बोरी परिसरात मागील पाच ते सहा महिन्यांपासून फिरणारा बिबट्या गुरुवारी रात्री वनखात्याने लावलेल्या सापळ्यात सापडला. जेरबंद केलेल्या या बिबट्याची रवानगी बोंडला अभयारण्यात करण्यात आली आहे. वनखात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपासून बोरी परिसरात या बिबट्याने दहशत निर्माण केली होती. लोकांना रात्रीच्यावेळी किंवा दिवसाढवळ्याही तो कधीकधी फिरताना दिसायचा. काही पाळीव प्राण्यांची शिकारही या बिबट्याने केली होती. त्याला पकडण्यासाठी फोंडा वन विभागाने सापळा लावला होता. या सापळ्यात शुक्रवारी सकाळी बिबट्या सापडल्याचे कळताच वनअधिकारी दीपक बेतकीकर व अन्य कर्मचार्‍यांनी सापळा लावलेल्या ठिकाणी धाव घेऊन सापळ्यासह बिबट्याला बोंडला अभयारण्यात नेले. 

वन खात्याचे उपवनपाल कुलदीप शर्मा यांनी बोंडला येथे जाऊन बिबट्याची पाहणी केली. हा बिबट्या स्थानिक लोकांना या परिसरात वारंवार दिसत असल्याने तेथील लोकांनी वनखात्याकडे तक्रार केली होती. यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावण्यात आल्याची माहिती वन अधिकार्‍यांनी दिली. मरड परिसरातही बिबट्या धारबांदोडा पंचायत क्षेत्रात दावकोण, मरड, आंबे व धुलैय परिसरातही लोकांना बिबट्या दृष्टीस पडत आहे. महिनाभरापूर्वी जयराम गावकर या बागायतदारावर झडप घालून बिबट्याने जखमी केले होते. धारबांदोडा येथे 15 दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी भररस्त्यावर उभा असलेला बिबट्या सदानंद गावडे या युवकाला दिसला होता. वनखात्याने परिसरात सापळा लावून या बिबट्यालाही जेरबंद करावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.