Tue, Apr 23, 2019 13:50होमपेज › Goa › भाषांतील समन्वयामुळे भाषांचा उद्धार 

भाषांतील समन्वयामुळे भाषांचा उद्धार 

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 19 2017 11:57PM

बुकमार्क करा

फोंडा : वार्ताहर 

इंग्रजीचा प्रभाव  वाढत असला तरी मराठी साहित्य निर्मितीवर त्याचा परिणाम झाला नसून मराठीत विपुल आणि सकस साहित्यनिर्मिती होत आहे.  भाषांतील समन्वयामुळे भाषांचा उद्धार होऊन साहित्यनिर्मितीला पोषक वातावरण मिळते, असे प्रतिपादन 15 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष मनस्विनी लता रवींद्र यांनी केले.

फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिराच्या सभागृहात श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या 15 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनात मनस्विनी लता रवींद्र बोलत होत्या.  
व्यासपीठावर कवयित्री, लेखिका व अभिनेत्री स्पृहा जोशी, रक्षा देशपांडे, कवयित्री व लेखिका अनुराधा नेरूलकर, संस्थेच्या स्वागताध्यक्ष ज्योती ढवळीकर, कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर, अध्यक्ष डॉ. पौर्णिमा उसगावकर व लक्ष्मी जोग उपस्थित होत्या.

जग बदलत असले तरी सावित्रीबाई फुले व इतर महिला साहित्यिकांनी दिलेले साहित्यातील योगदान नव्या पिढीला सदोदित प्रेरणा देत राहणार  आहे. बदलत्या साहित्यात बदलत्या काळानुसार आशय विषयाला स्पर्श करणारे लेखन करून नवीन वाचक घडवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला पाहिजे, असेही मनस्विनी लता रवींद्र म्हणाल्या. 

संगीता अभ्यंकर म्हणाल्या की, गोव्यात महिला साहित्य संमेलनाला मोठे भवितव्य आहे. अशा संमेलनातून महिलांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होत असते.   मान्यवरांच्या हस्ते ‘रूपेरी’ या स्मरणिकेचे व लक्ष्मी जोग यांच्या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. सुनंदा गावकर व डॉ. लीना साधले भागवत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्योती ढवळीकर यांनी स्वागत केले. डॉ. पौर्णिमा उसगावकर यांनी आभार मानले.