Wed, Mar 27, 2019 00:01होमपेज › Goa › पोळे, नगर्से येथील उड्डाण पुलांचे कठडे कोसळले

पोळे, नगर्से येथील उड्डाण पुलांचे कठडे कोसळले

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:53AMकाणकोण ः प्रतिनिधी 

महामार्ग क्र. 66 वरील चार रस्ता ते पोळे या चौपदरी रस्त्यावर नगर्से व चाररस्ता येेथे बांधण्यात आलेल्या दोन उड्डाण पुलाचे संरक्षण कठडे गुरुवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसाने कोसळले. या घटनेनंतर नगर्से उड्डाण पुलाखालून होणारी वाहतूक थांबवण्यात आली. कोसळलेल्या कठड्याची  माती बाजूला काढण्याचे काम पोकलॅनद्वारे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरू होते.

पहिल्या पावसात असा प्रकार घडल्यामुळे या रस्त्यावर बांधलेल्या सर्व उड्डाण पुलाची तपासणी, तळपण व गालजीबाग नदीवर बांधलेल्या पुलांच्या बांधकामाची तपासणी करण्याची मागणी येथील  समाजसेवक उमेश तुबकी यांनी केली आहे. 

उड्डाण पुलांचे संरक्षण कठडे कोसळल्याची माहिती मिळताच काणकोणचे उपजिल्हाधिकारी राजू देसाई, मामलतदार रमेश गावकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, स्थानिक नगरसेवक हेमंत नाईक गावकर, कंत्राटदाराचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. 

नगर्से उड्डाण पुलाखालून होणारी वाहतूक पोलिसांनी दुसरीकडून वळविली. त्यामुळे वाहनचाकांची गैरसोय झाली.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी नगर्से येथील उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या उड्डाण पुलाचे बांधकाम ठिक झाले नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. 

कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये, यासाठी काणकोण अग्‍निशमन दलाचा बंब घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. काणकोणचे उपजिल्हाधिकारी राजू देसाई घटनास्थळी ठाण मांडून होते.