Fri, Jul 19, 2019 20:04होमपेज › Goa › हॉस्पिसियोच्या ‘डायलेसिस’ला आग

हॉस्पिसियोच्या ‘डायलेसिस’ला आग

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 23 2018 12:11AMमडगाव : प्रतिनिधी

2013 पासून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळातील डायलेसिस विभागाला भीषण आग लागण्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या आगीत काही यंत्रोपकरणे व अन्य वैद्यकीय सामान जाळून खाक झाल्याने  सुमारे 1 कोटी रुपयांची हानी झाली,  अशी माहिती इस्पितळाच्या तांत्रिक अभियंता अनिता तळगडी यांनी दिली.

डायलेसिस विभाग शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आला होता. सायंकाळी 4  वाजता शेवटचे डायलेसिस करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता हॉस्पिसियोच्या दुसर्‍या मजल्यावरून धूर येत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. लगेच अग्निशामक दलाला पाचारण केले असता दुसर्‍या मजल्यावर असलेल्या डायलेसिस विभागात आग लागल्याचे त्यांनी पाहिले. संपूर्ण विभागाला आग लागली होती. आग विझविण्यासाठी तीन बंब अग्निशामक दलाकडून वापरण्यात आले. आग आटोक्यात आणण्यास  अग्निशामक दलाला  दोन तासांचा अवधी लागला. डायलेसिस विभागात मोठ्या प्रमाणात यंत्रोपकरणे होती. पण आगीत  यंत्रांची फारशी हानी झाली नाही, अशी माहिती हॉस्पिसियो इस्पितळातून देण्यात आली आहे. 

आग लागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट  झाले नसल्याची माहिती मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी गिल सोझा यांनी दिली. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर बंद खोलीत सिरिंज, स्पिरिट, औषधे, तसेच वैद्यकीय सामुग्री ठेवली असून  डायलेसिसची यंत्रे होती. एका यंत्राची किंमत 8 लाख रुपये असून  या आगीत दोन यंत्रेे जळून खाक झाल्याने सुमारे 16  लाख रुपयांचे नुकसान झाले. तर बाजूला असलेले एकूण 40 ऑक्सिजनचे सिलिंडर  बाजूला काढल्याने अनेकांचा जीव वाचला.प्राप्त माहितीनुसार डायलेसिस विभाग असलेल्या इमारतीत सुमारे 40 ऑक्सिजन सिलिंडर होते. त्यातील वीस सिलिंडर भरलेले होते तर वीस रिकामे होते.

अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सौजा यांनी सांगितले की, आग विझविण्यास अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक पाण्याचा बंब  होता.  मात्र, आग नियंत्रणात आणणे कठिण झाल्याने आणखी दोन बंब  मागवण्यात आले. यावेळी स्टोअर रूममध्ये नव्याने आणून ठेवलेली संपूर्ण वैद्यकीय सामग्री जाळून खाक झाली.  समोरच असलेली  पाच पैकी दोन डायलेसिसची यंत्रे जळाली असून अन्य यंत्रांनाही आगीची झळ बसली आहे. तर अन्य उपकरणेसुद्धा वापरण्याच्या स्थितीत नसल्याचे आढळून आले आहे, असेही ते म्हणाले. या खोलीत शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र आग लागण्यामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून पुढील तपास वीज खात्याकडे सोपविण्यात आल्याचे गिल सोझा म्हणाले.

इमारत आधीच धोकादायक घोषित

आरोग्य खाते आणि हॉस्पिसियोकडून या विभागाचे  प्रभारी डॉ. व्यंकटेश रेड्डी यांना हा विभाग खाली करण्याचे आदेश 2013 साली देण्यात आले होते. या इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला धोकादायक ठरविण्यात आला होता. पण डायलेसिस विभागाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने दुसर्‍या मजल्यावरील हा विभाग तसाच सुरु ठेवण्यात आला होता, अशी माहिती हॉस्पिसियोच्या अधीक्षक डॉ.आयरा आल्मेदा यांनी दिली.नुकतेच सार्वजनिक बांधकाम खाते आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती, असेही डॉ.आल्मेदा  म्हणाल्या.