Sun, Aug 25, 2019 12:55होमपेज › Goa › मडगावात आठ दुचाकींना आग; 5.5 लाखांची हानी

मडगावात आठ दुचाकींना आग; 5.5 लाखांची हानी

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 1:27AMमडगाव : प्रतिनिधी

मालभाट येथील न्यू येरा हायस्कूलजवळच्या श्रीराम चेंबर्स सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या 8 दुचाकींना रविवारी पहाटे 4 वाजता अचानक आग लागून  त्या जळून खाक झाल्या. यात सुमारे 5.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण  स्पष्ट झाले  नसून यामागे घातपाताचा संशय स्थानिकांनी व्यक्‍त केला आहे. याप्रकरणी पुढील तपासासाठी मडगाव पोलिसांना कळवण्यात येणार आहे, अशी  माहिती मडगाव अग्निशामक दलाचे विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर यांनी दिली.  

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास  मडगाव मालभट येथील न्यू येरा हायस्कूलजवळ पार्क केलेल्या आठ दुचाकींना अचानक आग लागली. परिसरातील लोकांनी याविषयी मडगाव अग्निशमन दलाला संपर्क साधून माहिती देताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी बाबूसो पाटील, वाहनचालक निलेश नाईक, निलेश म्हापसेकर व अनिल तेली यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पाच दुचाकी जळत होत्या. आगीवर नियंत्रण आणण्यापूर्वी इतर तीन दुचाकींनीही  पेट घेतला.

यावेळी अजित पाटील यांची बजाज पल्सर 150 (एम एच 09 सी एफ 8746), सुगंधा बाणावलीकर यांची टीव्हीएस ज्युपिटर (जीए 08 ए के 1090), मुक्तेश खात्री यांची  सुझुकी जिनस व सुझुकी स्विंग शॉट (जी ए 08 डी 5771 व जी ए 08 एस 5247), श्रीकांत बाणावलीकर यांची होंडा अ‍ॅक्टीव्हा (जी ए 07 बी 3337), सावळाराम प्रेमाराम यांची टीव्हीएस स्टार सिटी व रॉयल एनफिल्ड बुलेट (जी ए 08 डी 3108 व जी ए 03 ए डी 0882) या आठही दुचाकी या आगीत भस्मसात  झाल्या.