Thu, Sep 20, 2018 00:04होमपेज › Goa › सुकूर येथे म्युझिक स्टुडिओला आग; 50 लाखांचे नुकसान

सुकूर येथे म्युझिक स्टुडिओला आग; 50 लाखांचे नुकसान

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:48PMम्हापसा : प्रतिनिधी

वाडे सुकूर येथे सेबेस्तियन आल्मेदा यांच्या म्युझिक स्टुडिओला लागलेल्या आगीत स्टुडिओ जळून खाक झाल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार आग लागण्याची घटना   शुक्रवारी दुपारी 1.45 च्या सुमारास घडली. आल्मेदा यांनी आपल्या एकमजली घराच्यावर लाकडी पोटमाळा बनवून त्यात म्युझिक स्टुडिओची निर्मिती केली होती. या स्टुडिओमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आग लागताच घरातील लोकांनी बाहेर धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा व पिळर्ण येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या जवानांनी घराचा तळमजला व शेजारील एक घर आगीपासून वाचविण्यात यश मिळविले. या आगीत स्टुडिओमधील 62 गिटार, फर्निचर, सोफासेट, फीझर इतर वीज व संगीत उपकरणे, छप्पर जळाल्याने  अंदाजे 50 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अग्नीशमन दलाचे  जवान ज्ञानेश्‍वर सावंत, गोविंद देसाई, भगवान पाळणी, हितेश परब, सुभाष माजिक, पिळर्ण येथील अग्नीशमन दलाचे उपअधिकारी प्रदीप मांद्रेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी आग विझवली.