Tue, May 21, 2019 00:03होमपेज › Goa › डिसेंबरमध्ये ‘फेस्टिव्हल्स’ची रेलचेल 

डिसेंबरमध्ये ‘फेस्टिव्हल्स’ची रेलचेल 

Published On: Dec 02 2017 12:25AM | Last Updated: Dec 02 2017 12:16AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

‘जीवाचा गोवा’ करण्यार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारसह अनेक संस्थांनी डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे उपक्रम आणि फेस्टिव्हल्सचे आयोजन केले आहे. एकामागून एक फेस्टिव्हल्स आयोजित केले जाणार असून लाखो पर्यटकांसाठी हा इव्हेन्टचा महिना म्हणजे मोठी पर्वणीच आहे. शासकीय पातळीवरून महोत्सवांची जय्यत तयारी सुरू आहे. गोव्याला सरासरी साठ लाख पर्यटक वर्षभरात भेट देतात. यंदाही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

जागतिक वारसास्थळ म्हणून  प्रसिद्ध असलेल्या सेंट झेवियर्सचे ‘व्हडल्या सायबाचे फेस्त ’येत्या 4 डिसेंबरला (सोमवारी) होत आहे. यावेळीही लाखो देशी- विदेशी पर्यटक जुनेगोवेमध्ये उपस्थित असतील. सुरक्षेच्यादृष्टीने सरकारने सर्व तयारी केली आहे. पोलिस बंदोबस्त वाढविला असून पर्यटक व भाविकांचे सेंट झेवियर फेस्तसाठी  आगमन सुरू झाले आहे.

पणजीत 7 डिसेंबरला पहिला ‘फिश फेस्टीवल’ होईल. या निमित्त बांदोडकर मैदानावर दररोज करमणुकीचे व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. केंद्रीयमंत्री राधामोहन सिंग या महोत्सवात उपस्थित राहतील. चार दिवस या महोत्सवात गोव्यातील विविध प्रजातीची मासळी पर्यटकांना पहायला व खाण्यासाठी उपलब्ध असेल. गोव्यातील मच्छीमारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचीही सोय या महोत्सवात असणार आहे.  

 कला आणि साहित्य क्षेत्रात मान्यता असलेला ‘लिटररी फेस्टीवल ’  गोव्यात 7 डिसेंबरपासून  होणार आहे. साहित्य अकादमीची मान्यता लाभलेले देशभरातील  अनेक इंग्रजी, हिंदी, मराठी साहित्यिक या महोत्सवात सहभागी होणार आहेत.  दोनापावला येथील  ‘गोवा इंटरनॅशनल सेंटर’ मध्ये हा महोत्सव  10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.युवा वर्गाचे आकर्षण असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’ अर्थात ‘ईडीएम’ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात  27 डिसेंबरपासून वागातोर येथे आयोजित केला जाणार आहे.  सुमारे पन्नास हजार पर्यटक ईडीएममध्ये सहभागी होतील,असा अंदाज आहे. जोरदार ‘ट्रान्स’ संगीताच्या तालावर बेधूंद नाचणारे पर्यटक या फेस्टीवलमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.